मुंबई, दि. 9 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगभरात चिंतेचं कारण ठरलेल्या ‘कोरोना’ विषाणूचा आपल्याकडे प्रादुर्भाव आढळलेला नाही. मात्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी व आरोग्यदायी पद्धतीनं होळी व धुलिवंदनाचा आनंद लुटावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्यातील शहरात आणि गावखेड्यात यंदाही होळी व धुलिवंदनाचा सण पारंपरिक उत्साहाने साजरी व्हावा, वृक्षतोड न करता पर्यावरणाचं रक्षण करीत होळीचं दहन व्हावं. धुलिवंदनाचा आनंद लुटताना पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगाचाच वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. जगभरात ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असताना आपण विशेष काळजी घेण्याची गरज आहे. धुलिवंदनाचा सण साजरा करीत असताना यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या सूचनांचे अवश्य पालन केले जाईल. मात्र, होळी व धुलिवंदनाच्या उत्साहात जराही कमी होणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.