जळगाव, दि. ९ (जिमाका): सार्वजनिक आरोग्याचा खरा मंत्र हा स्वच्छता असून स्वच्छतेमुळे गावाच्या विकासासोबत ग्रामस्थांचा विकास देखील साधला जातो त्यामुळेच ग्रामीण भागात स्वच्छतेला महत्त्व देऊन ग्रामपंचायतीनी स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शाहू महाराज सभागृहात, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आयोजित ट्राय सायकल वाटप कार्यक्रमात मंत्री श्री. पाटील बोलत होते.
या वेळी खासदार स्मिता वाघ, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश भोगावडे, अनिल भदाणे आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, स्वच्छ परिसर व स्वच्छ गाव ही प्रत्येकाची वैयक्तिक व सामूहिक जबाबदारी आहे. गावाच्या स्वच्छता मोहिमेला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तीन चाकी सायकलिंगचे वितरण करण्यात येत आहे. या ई-बाइक सायकलींच्या वापरामुळे गावातील स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविता येणार आहे. या सायकलींमुळे कमी खर्चात व सोप्या देखभालीत उत्तम प्रकारे गावातील स्वच्छता करता येणार आहे. वाटप करण्यात येत असलेल्या सायकलीमध्ये ओला आणि सुका कचरा साठविण्यासाठी दोन कप्पे करण्यात आलेले असल्याने कचरा संकलनासोबतच कचऱ्याचे विलिनीकरण करणे देखील सोपे होणार आहे. जिल्हा परिषदेतंर्गत अलीकडेच मोठ्या प्रमाणात ग्रामसेवकांची भरती करण्यात आली असल्याने ग्रामीण भागातील ग्रामसेवकांची कमतरता देखील दूर झाली आहे. सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांनी ग्रामस्थांच्या सोबतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करण्याची आवश्यकता असून या कामासाठी सर्वानी योगदान देण्याची गरज असल्याचेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.
खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, ग्रामीण भागात अनेकदा कचरा संकलनाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागासाठी घनकचरा व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रामपंचायतीना उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे कचरा संकलनासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीना अशा प्रकारच्या घंटा गाड्या उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी श्री.अंकित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या माध्यमातून अनेक वस्तूंची निर्मिती होऊ शकते. या बाबींकडे ग्रामपंचायतीनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कचऱ्याचे संकलन आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीनी पाऊले उचलून कचरा व्यवस्थापनाकडे दिले पाहिजे.
०००