जलसंपदा विभागाच्या १२५ प्रकल्पांसाठी ८० हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाचा शुभारंभ

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): राज्यात शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी  जलसंपदा विभागाच्या 125 प्रकल्पांसाठी 80 हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी ता. राधानगरी येथील धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी धरण प्रकल्पाच्या घळ भरणीच्या कामामुळे चार टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. धामणीच्या चार टीएमसी पाण्यामुळे हजारो शेतकऱ्यांची तहान भागेल व शेतीलाही पाणी उपलब्ध होईल. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जलसंपदा विभागाचे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले,  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी  कार्तिकेयन एस., प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता के. डी. शिंदे, कार्यकारी अभियंता शिल्पा मगदूम राजे, उपशाखा अभियंता संजय पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, शासनाने गेल्या अडीच वर्षात राज्यामध्ये अनेक प्रकल्प राबविले आहेत. जनतेसाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, साडेसात एचपी पर्यंत कनेक्शन असणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अशा अनेक योजना सुरु केल्या आहेत. आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातून पहिली रेल्वेगाडी तीर्थदर्शनासाठी सोडण्यात आली. शिक्षणासाठी मुलींना शंभर टक्के फी माफी योजनाही राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

धामणी धरण प्रकल्पाची माहिती

धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम धामणी नदीवर मौजे राई, ता.राधानगरी, येथे प्रगतीपथावर आहे. मुख्य धरण मातीचे आहे.  हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राधानगरी तालुक्यातील 7 गांवे, गगनबावडा तालुक्यातील 7 गावे  व पन्हाळा तालुक्यातील 11 गावे असे एकूण 25 गावांचे 1400 हे. ( 2100  हे.पिकक्षेत्र) क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. धामणी नदीवर साखळी पध्दतीने एकूण 10 को.प. बंधारे बांधण्याचे नियोजन असून यापैकी 7 बंधारे पूर्ण झालेले आहेत. उर्वरित 3 को.प.बंधारे बांधकाम प्रगतीपथावर आहे. धरणाचे मातीकाम 50 %  पूर्ण, व वळण कालव्याचे खोदकाम 95 % काम पूर्ण, ICPO विहिरीचे संधानक काम 98 % काम पूर्ण व धरण पोहोच रस्त्याचे 65% काम पूर्ण झालेले आहे. या धरणाचा सांडवा द्वाररहित असून सांडवा बारची लांबी 160 मी. इतकी आहे.  सांडवा खोदाईचे सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले असून पुच्छ कालव्याचे सुमारे 50 टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. ICPO विहिरीचे संधानक काम 98 % काम पूर्ण, वायपीस व ट्रॅशरॅकच्या अंतस्थ: सुट्या भागांचे उभारणी काम पूर्ण व पातनळ उभारणीचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे.

धरणाच्या द्वितीय टप्प्यातील घळभरणी सन 2025-26 मध्ये जून 2026 अखेर पूर्ण करून प्रकल्पात पूर्ण क्षमतेने 109.034 दलघमी. पाणीसाठा व 2100 हे. सिंचन निर्मिती करण्याचे नियोजन आहे. या धरणासाठी आज अखेर एकूण रु.595.15 कोटी इतका खर्च झाला आहे.