नंदुरबार, दिनांक 12 ऑक्टोंबर, 2024 (जिमाका वृत्त) – शासनाच्या आदिवासी विकास विभागाने बिलगांव ते सावऱ्या दिगर येथील पुलासाठी 45 कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे येत्या एक ते दीड वर्षात हा पूल पूर्णत्वास येऊन, या अतिदुर्गम भागातील बारा ते पंधरा हजार आदिवासी बांधवांसाठी हा पूल विकासाचा सेतू ठरेल, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या बारा वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या बिलगाव ते सावऱ्या दिगर येथील उदई नदीवरील पूल आणि बोधी नाल्यावरच्या पुलांच्या कामाचे भूमिपूजन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी माजी खासदार डॉ हिना गावित, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता कुणाल पावरा, विज वितरणचे उपकार्यकारी अभियंता जगदिश पावरा, तालुका वैद्यकीय अधिकारी कांतीलाल पावरा , सुभाष पावरा , शिवाजी पराडके, राड्या पावरा , जोमा पावरा, दिलीप सरंपच, खुशाल पावरा, लितिश मोरे, हिरालाल काळूसिंग यांच्यासह परिसरातील गावचे सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्राणी तालुक्यातील अतिदुर्मग भाग असलेल्या सावऱ्या दिगरच्या पुलाचे काम गेल्या अनेक वंर्षापासून निधी अभावी रखडले होते. 2012 साली मान्यता मिळालेल्या या पुलासाठी भरीव निधीची गरज होती. मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागातूना यासाठी 45 कोटींच्या भरीव निधीला मान्यता देत या कामाची निविदा प्रक्रीया देखील पुर्ण केली. त्यांच्या हस्ते या रखडलेल्या पुलाचे काम महिन्या दिड महिन्यात सुरु होणार आहे. या 45 कोटींमध्ये या भागातील उदई नदीवरील सावऱ्या दिगरच्या पुलासह बोधी नाल्यावरच्या पुलाचे काम देखील होणार आहे. मुळातच या पुलाअभावी या भागातील 08 गाव आणि अनेक पाड्यातील लोकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता. आरोग्य यंत्रणेला देखील याठिकाणी पोहचण्यात मोठी अडसर निर्माण होत होती. तर पावसाळ्यात पाणी आल्याने या भागाती गावांचा संपर्क तुटत असल्याने महसुल यंत्रणेला देखील स्वस्त धान्य दुकानाचे चार महिन्याचे रेशन एकाचवेळी गावात पोहचवून ठेवावे लागत होते. त्यामुळे या गाव परिसरातील नागरीकांनी या पुलाच्या बांधकामासाठी आदिवासी विकांसमंत्री यांनी साकडे घातले होते.
या पुलाच्या उद्घाटनावेळी हा पुल या भागातील बारा ते पंधरा हजार आदिवासी बांधवांना शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी विकास सेतू म्हणून उपयोगात येईल असा विश्वास मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी व्यक्त केला. या भागातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राज्यातील शासन कटीबद्ध असून आदिवासी बांधवांना मागेल ती योजना देण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचेही यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित म्हणाले. या पुलाप्रमाणेच या भागातील रस्ते आणि विद्युतीकरणासाठी देखील मोठी निधी मंजुर करुन दिला असून येत्या दोन तीन महिन्यात अनेक वाड्या- पाड्यांपर्यत वीज पोहचून वीज समस्येचे निराकरणे होईल असा विश्वास देखील मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी येथील नागरिकांना दिला.
या पुलामुळे या भागातल्या सावऱ्या दिगर, बमाना, उडद्या, खोपरगाव. मांजरी, मुखानी, बादल अशा मोठ्या गावांना जाण्याचा जवळचा मार्ग प्रस्थापित होणार असल्याने या ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाचा प्रवास सुकर होणार असल्याचे यावेळी माजी खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या. आश्रमशाळांच्या बळकीटकरणातून आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सोईसुविधांयुक्त शिक्षण, शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी घरकुल, लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, शबरी महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या हाताला काम, अशा विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकारकडून सुरु असल्याचे देखील यावेळी माजी खासदार डॉ हिना गावित म्हणाल्या.