नाशिक जिल्ह्यात यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे- खर्च निरीक्षक डॉ. पोरियासामी एम.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

नाशिक, दि. २३ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर नियुक्त भरारी पथकांसह सर्व यंत्रणांनी मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे व सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून समन्वयाने काम करावे, अशा सूचना 123-नाशिक पूर्व, 124-नाशिक मध्य,  125- नाशिक पश्चिम, 126- देवळाली (अ.जा.), 127-इगतपुरी (अ.ज) विधानसभा मतदारसंघांसाठी नियुक्त खर्च निरीक्षक डॉ. पोरियासामी एम. यांनी दिल्या.

खर्च निरीक्षक तथा भारतीय राजस्व  सेवेतील वरीष्ठ अधिकारी असलेले डॉ. सामी यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे  त्यांच्या पथकातीलस सदस्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मीरखेलकर यांच्यासह संबंधित विभागाचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

श्री. सामी यांनी यावेळी सर्व नोडल अधिकारी यांचा परिचय करून घेत त्यांच्याकडून  करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला. मा. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार वाहनांची तपासणी अधिक दक्षपणे करण्याच्या सूचना दिल्या. सर्व पथकांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे प्रभावीपणे काम करावे. भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक  गोष्टींची नोंद ठेवून सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या संपर्कात राहावे. मतदारांना प्रभावित करण्यासाठीच्या रोकड, मद्य तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंध करावा. कारवाईमध्ये सातत्य ठेवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

०००