मतदारजागृतीसाठी लातूर जिल्ह्यात ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा नवमतदारांशी संवाद

  • दयानंद विज्ञान महाविद्यालय येथील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • कुटुंब, मित्र परिवारातील व्यक्तींमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचा संकल्प

लातूर, दि. २४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम आयोजित करण्यात होता. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी युवा मतदारांशी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले.

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी नागेश मापारी, योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिध्देश्वर बल्लाळे, डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. संध्या वाडीकर, प्रा. विलास कोमटवाड, डॉ. संदीपान जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.

निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि मत हा लोकशाहीसर्वात सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक युवा मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजवावा. यासोबतच आपल्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले. प्रत्येक मत हे मौल्यवान असून आपल्याला मिळालेल्या या अधिकाराचे मोल लक्षात घेवून नवमतदार, वयोवृद्ध नागरिक, महिला यांनी मतदान करावे, असे त्या यावेळी म्हणाल्या.

युवकांशी मनमोकळा संवाद आणि निवडणूक प्रक्रीयेबाबत प्रश्नोत्तरे

‘कॉफी विथ कलेक्टर’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी युवक-युवतींशी मनमोकळा संवाद साधत त्यांना लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक मतदाराचे महत्व याबाबत माहिती दिली. तसेच निवडणूक प्रक्रिया, लोकशाही व्यवस्था याबाबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विविध बाबींवर प्रकाश टाकला. यामध्ये युवक-युवतींनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच लोकशाही आणि निवडणुकीबाबत आपले मत व्यक्त केले.

प्रारंभी उपस्थित सर्वांना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली. तसेच डॉ. संदीपान जगदाळे यांनी मतदानाचे महत्त्व सांगणारा पोवाडा सादर केला.

०००