सोलापूर, दि. १४: आगामी विधानसभा निवडणूक-2024 चे मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहे. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडून मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासन विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करीत आहे. या अंतर्गतच 254-माळशिरस विधानसभा(अ.जा.) मतदारसंघांमध्ये अकलूज नगरपरिषद,रोटरी क्लब अकलूज व रोटरी क्लब सराटी डिलाईट यांनी ‘RUN FOR VOTE’ या स्वरूपाची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून मतदान जनजागृती चा अभिनव उपक्रम राबविला.
सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ही मॅरेथॉन अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे सकाळी ७ वा. पार पडली. यात १८ मुलींनी सहभाग नोंदविला. पुरुषांच्या स्पर्धेत ६२ मुले व नागरिक सहभागी झाले. ७ वर्षाच्या २ मुलांनी ०३ किमी धावून मॅरेथॉन पूर्ण केली. यामध्ये अकलूज परिक्षेत्राचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी देखील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. मॅरेथॉन मध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविले. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून, लोकशाही परंपराचे जतन करण्याचे तसेच नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांची पावित्र्य राखण्याची तसेच कोणत्याही प्रलोभनास अथवा दबावास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी धनशैल्य विद्यालय, गीरझनी व किडझी स्कूल, अकलूज या शाळेतील तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांनी मतदान जनजागृतीचे पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमाचे नियोजन अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नोडल अधिकारी स्वीप – दयानंद गोरे व रोटरी क्लब अकलूज अध्यक्ष प्रिया नागणे, सचिव मनीष गाकवाड, रोटरी क्लब सराटी डिलाईटचे अध्यक्ष जगदीश कदम, सचिव महादेव पाटील यांनी केले.
०००