- मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन केले कौतुक
नागपूर, दि. १६ : ‘लोकराज्य’ चे दुर्मिळ अंक हे माहितीचा अमूल्य ठेवा असून त्याचे जतन व संवर्धन होण्याकरिता या अंकांचे डिजिटायजेशन करण्याच्या सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी विधानभवन परिसरातील लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
नागपूर-अमरावती विभाग संचालक कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास मंत्री, आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन राज्याच्या गौरवशाली परंपरेच्या माहितीचा ठेवा असणाऱ्या या प्रदर्शनाचे कौतुक केले.
उद्घाटन प्रसंगी नागपूर-अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे, लोकराज्यचे संपादक तथा संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, वरिष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरे, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, वर्धा जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी यावेळी उपस्थित होते.
महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच या दुर्मिळ अंकांचा ठेवा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटायझेशन आणि अन्य आधुनिक पद्धतीचा उपयोग करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. दुर्मिळ अंकांच्या मांडणीचे कौतुकही त्यांनी केले.
प्रदर्शनात वैविध्यपूर्ण माहितीचा ठेवा असणारे दुर्मिळ अंक
1964 पासूनचे अंक येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर आणि कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित अंक, मराठी संगीत रंगभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, मराठवाडा विकास व सांस्कृतिक अंक, स्वातंत्र्यदिन विशेषांकासह महाराष्ट्र राज्यातील महान व्यक्तीमत्वे, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक असा वैविध्यपूर्ण ठेवा तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे 150 अंक या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत.
मान्यवरांच्या भेटी व सेल्फी स्टँडवर छायाचित्रे
विधीमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने विधानभवन परिसरात विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची लगबग होती. वाटेतच लोकराज्य दुर्मिळ अंकांचे आकर्षक प्रदर्शन दिसताच त्यांनी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी पाहणी करून आपल्या प्रतिक्रियाही नोंदविल्या. याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी स्टँडवर पोज देऊन छायाचित्रेही काढून घेतली.
भेट देणाऱ्यांमध्ये मंत्री, ॲड. आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, बाबूसिंग राठोड, अबू आझमी, श्रीजया चव्हाण, सुहास बाबर, देवराव भोंगळे यांचा समावेश आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, वनविभागाचे उपसचिव विवेक होशिंग, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धिरज अभंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रदर्शनास भेट दिली. अधिवेशन कालावधीमध्ये दररोज सकाळी 9 वाजता पासून हे प्रदर्शन पाहण्यास उपलब्ध राहणार आहे.
०००