परभणी, दि. २१ (जिमाका) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जावून सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, नांदेड परीक्षेत्र विभागाचे पोलीस विशेष उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, प्र. जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव उपस्थित होते.
श्री. पवार यांनी सोमनाथ यांच्या आई व भावांकडून त्यांची व्यथा ऐकून घेतली. परभणीत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या कुटुबियांतील सदस्याला शासकीय सेवेत नोकरी मिळावी आणि याबाबतच्या खटल्याची जलदगती न्यायालयात सुनावणी घेण्यात यावी. तसेच शासनाने जाहीर केलेली मदत वाढवावी. या त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचा शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. तसेच कुटुंबीय पुण्यात राहत असल्यामुळे त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
0000