मुंबई, दि. 24 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वित्त व नियोजन’सह ‘राज्य उत्पादन शुल्क’ या दोन्ही विभागांची आज आढावा बैठक घेतली. श्री. पवार यांनी करसंकलन आणि महसुलवाढीच्या प्रक्रियेत सुसूत्रता, सुधारणा आणत परिणामकेंद्रित काम करण्याचे निर्देश यावेळी दिले. अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेवर भर देऊन करचोरी, करगळती रोखण्याच्या कामात हयगय करु नये, असे यावेळी सांगितले.
यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. अशिष जयस्वाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्य आयुक्त आशीष शर्मा, वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव शैलजा ए., लेखा व कोषागारे विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपसचिव रविंद्र औटे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सह आयुक्त विश्वनाथ इंदिसे, सहआयुक्त सुनिल चव्हाण, अपर आयुक्त यतीन सावंत, उपायुक्त सुभाष बोडखे, उपायुक्त शंकर जगताप आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीदरम्यान प्रलंबित योजना, आवश्यक निधी, राज्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतला. राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. श्री. पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या.