दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास कारवाई होणार- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

दूध, अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास १८००२२२३६५ या हेल्पलाईनवर संपर्क करावा

मुंबई१५ – :  आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो. मात्र राज्यात काही ठिकाणी दुधात  भेसळीचे प्रकार होत असल्याचे   निदर्शनास येत आहे.  त्यानुसार अन्न व औषध प्रशासन  विभागाने आज एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबविण्यात येऊन १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने  विश्लेषणासाठी  ताब्यात घेतले. या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत अशी माहिती, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ ची अंमलबजावणी करुन राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याबाबत विविध उपाययोजना करीत असल्याचे मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

दूध/दुग्धजन्य अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर जरब बसण्याकरिता व भेसळ रोखण्याकरिता तसेच राज्यातील जनतेस उपलब्ध होणाऱ्या दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्याच्या अनुषंगाने  आज १५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळराज्यमंत्री  योगेश कदम यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रशासनामार्फत संपूर्ण राज्यात व्यापक स्वरूपात दूध या अन्नपदार्थाची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत एकाचवेळी राज्यभरातील विविध ठिकाणांहून दूधाचे सर्वेक्षण नमुने घेऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी १०३ अन्न सुरक्षा अधिकारी यांना सर्वेक्षण नमुने घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज सकाळी ५.०० वाजेपासून राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दूध उत्पादकवितरकविक्रेते व रस्त्यावरील विक्री केंद्रांवरून १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले.  त्यापैकी राज्यात विक्री होणाऱ्या विविध ब्रान्डच्या दुधाचे ६८० पाउच / पिशवी पॅकिंग मधून व ३८२ सुट्या स्वरूपातील दुधाचे आहेत. ताब्यात घेण्यात आलेले  नमुने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकृत अन्न प्रयोगशाळेत पाठवून भेसळरसायनांचे प्रमाण व दूधाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे.

या सर्वेक्षण नमुने विश्लेषणांती दुधाच्या नमुन्यामध्ये भेसळ आढळल्यास तात्काळ या आस्थापनेमधून कायदेशीर नमुने घेऊन संबंधित उत्पादक व पुरवठादार यांचेवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी  सांगितले की, “दूधातील भेसळ ही गंभीर समस्या आहे. नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी  दूध भेसळ हा विषय  गांभीर्याने घेतला आहे. भेसळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने आज राज्यभरामध्ये दूधाचे सर्वेक्षण नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. अन्न भेसळ रोखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा वारंवार घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी दूध किंवा अन्नपदार्थांमध्ये भेसळ दिसल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाइन क्रमांक [१८००२२२३६५] वर त्वरित संपर्क साधावा किंवा jc-foodhq@gov.in या ईमेल वर किंवा https://foscos.fssai.gov.in/consumergrievance या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.” असे आवाहन अन्न व औषध प्रशासन आयुक्त  राजेश नार्वेकर  यांनी केले आहे.

००००