भविष्य वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचविणे आवश्यक – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

चंद्रपूर येथे ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’चे उद्घाटन

चंद्रपूर दि. १६ : लोकसंख्या वाढत असल्यामुळे गरजासुध्दा वाढल्या आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन पूर्णपणे बिघडले असून आपले भविष्य वाचवायचे असले तर पर्यावरण वाचविणे आवश्यक आहे. त्यासाठी आज आपण पाऊले उचलली तर येणाऱ्या पिढीला आपण चांगले भविष्य देऊ शकतो, असे विचार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि सीटी युनिर्व्हसिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे आयोजित तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’ चे उद्घाटन करतांना राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे, एस.एन.डी.टी. विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, प्रसिध्द जलपुरुष राजेंद्र सिंह, हैद्राबाद येथील युएस काँसलेट जनरल सलील कादर, सीटी युनिर्व्हसिटीचे प्रोफेसर नील फिलीप, आदी उपस्थित होते.

ग्लोबल वॉर्मिंग आज सर्वात मोठी जागतिक समस्या बनली आहे, असे सांगून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, जास्त लोकसंख्येमुळे गरजासुध्दा जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक स्त्रोत कमी होत आहे. जल, जंगल, जमीन वाचविले तरच पर्यावरण वाचणार आहे. एस.एन.डी.टी विद्यापीठ, सीटी युनिर्व्हसिटी ऑफ न्युयॉर्क आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यामाने पर्यावरण संरक्षण या अतिशय महत्वाच्या विषयावर चंद्रपूर येथे तीन दिवसीय परिषदेचे आायोजन करण्यात आले आहे. क्लायमेट चेंज या मानवासमोर असलेल्या सर्वांत गंभीर विषयावर या परिषदेतून नक्कीच उपाययोजना सुचविण्यात येतील.

बदललेले हवामान आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा परिषदांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासंदर्भातील चर्चा, त्यावरची अंमलबजावणी होण्यास मदत होईल. तसेच भविष्यातील पिढीसाठीसुध्दा चांगल्या उपाययोजना करता येतील. ही एक चांगली सुरवात असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये पर्यावरण या विषयाचा  मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे.

एस.एन.डी.टी. विद्यापीठाबाबत बोलतांना राज्यपाल म्हणाले,  विद्यापीठाने चंद्रपूर सारख्या दुर्गम जिल्ह्यात उपकेंद्र सुरू करून येथील महिलांना कौशल्य विकासाचे दालन उघडे करून दिले आहे. जवळपास ५० एकर क्षेत्रात उभे राहणारे हे विद्यापीठ महिलांना ख-या अर्थाने सक्षम करण्याचे काम करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरण संरक्षण ही लोकचळवळ व्हावी : आमदार सुधीर मुनगंटीवार

आपण वनमंत्री असतांनाच ‘सी फॉर चंद्रपूरमध्येच ‘क्लायमेट चेंज’ या विषयावर परिषद घेण्याचे निश्चित केले होते. पर्यावरण संरक्षणाच्या या युध्दात राज्यपाल महोदय आज चंद्रपुरात आले, मी त्यांचा आभारी आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आयोजित ही तीन दिवसीय परिषद केवळ चर्चेसाठीच नाही तर, अंमलबजावणीची गती वाढविणे ही काळाची गरज आहे. मानवाने पर्यावरणाचे संतुलन बिघडविले आहे. त्यामुळे या परिषदेतून लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी व्हावी. पर्यावरणासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, खऱ्या अर्थाने ही लोक चळवळ व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.

जल, जमीन, जंगल हेच आपले दैवत : जलपुरुष राजेंद्र सिंह

‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’ या विषयावर अतिशय चांगला उपक्रम आज चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. देशात जलसाक्षरता राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. जल, जमीन, जंगल वाचले तरच आपली संस्कृतीही वाचणार आहे. त्यामुळे हेच आपले दैवत आहे. मंत्री असतांना सुधीर मुनगंटीवार यांनी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबवून राज्यातील १०८ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले. नद्या वाचविणे आावश्यक आहे, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी राज्यपालांच्या हस्ते ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स बुक प्रोसिडींग’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्राध्यापक, सीटी युनिर्व्हसिटी ऑफ न्युयॉर्कचे विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी आदी उपस्थित होते.

००००