पुरुष विभागात मुंबई शहर पूर्व तर महिला विभागात पुणे ग्रामीण जिल्हा संघ विजयी
बारामती, दि.19: महाराष्ट्र राज्य खेळाच्या बाबतीत अग्रेसर राहिला पाहिजे, खेळाडूंना बक्षिसाच्या माध्यमातून भरीव रक्कम मिळाली पाहिजे यादृष्टीने क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रश्न मार्गी लावण्याकरीता राज्यशासनाचा सकारात्मक प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
पुरुष विभागात पुणे ग्रामीण आणि मुंबई शहर पूर्व तर महिला विभागात पुणे ग्रामीण आणि मुंबई शहर पश्चिम यांच्या झालेल्या अंतिम सामन्यात पुरुष विभागात मुंबई शहर पूर्व संघ तर महिला विभागात पुणे ग्रामीण संघ विजयी झाले.रेल्वे मैदानावर आयोजित कार्यक्रमात
विजेत्या संघास उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, कबड्डी हा पारंपरिक खेळ असून त्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता प्रयत्न करण्यात येईल.
कोणत्याही स्पर्धेत जय पराजय निश्चित असतो त्यामुळे जिंकण्यासाठी सर्व खेळाडूकडे खेळाडूवृत्ती असली पाहिजे, पराभव हा आदरपूर्वक, सन्मानजनक असला पाहिजे. विजयी संघांनीदेखील विजयाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, पराभूत संघांनी पराभवाचे शल्य मनात न ठेवता नव्या उमेदेनी पुढील तयारी केली पाहिजे. पराभूत संघाची सुध्दा लोकांनी स्तुती केली पाहिजे अशा प्रकारची कामगिरी संघाकडून झाली पाहिजे. खेळाडूंनी खेळ पूर्ण क्षमतेने खेळ खेळून उत्कृष्ट कामगिरी करत सर्वोत्कृष्ट खेळ दाखविला पाहिजे.
राज्य सरकारच्यावतीने क्रीडा क्षेत्राकरीता विविध निर्णय घेण्यात आले असून हे निर्णय खेळाडूसह क्रीडा रसिकांना उपयुक्त ठरणार आहेत. पुढच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांच्या आयोजनाकरीता राज्यशासनातर्फे १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, राज्य शासनाच्यावतीने क्रीडा विभागासाठी निर्णय घेण्यात आले असून त्याचा खेळाडूंना निश्चित लाभ होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.
कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा क्षेत्रातील विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन बारामतीकरांना लाभ मिळाला पाहिजे, त्याचा आनंद घेता यावा याकरीता अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आपणही या स्पर्धा, कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला आहे, याचा मला अभिमान आहे. कबड्डी स्पर्धेत खेळाडूंच्यावतीने क्रीडा रसिकांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे खेळ खेळण्यात आले. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेशी स्पर्धा आयोजित करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यापुढे अशाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतील, असेही श्री. पवार म्हणाले.
महाराष्ट्र राज्य सहकार बँकेच्यावतीने कबड्डी खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेस 95 लाख रुपयांचा धनादेश श्री. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदोरे, अर्जून पुरस्कारार्थी शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, मायाजी आकरे, महाराष्ट्र राज्य सहकार बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्यासह राज्य कबड्डी संघटना व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, क्रीडाप्रेमी यावेळी आदी उपस्थित होते.
श्री. चांदोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन श्री. कसगावडे यांनी केले.
००००