शून्य अपघात मृत्यूदर साध्य करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबवा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

रस्तासुरक्षा संदर्भात नागपूर-अमरावती विभागाचा आढावा

वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश

वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रांचा वापर; अपघातांच्या कारणांचा शोध घेवून उपाययोजना

नागपूर दि 22 : रस्ते अपघात टाळण्यासोबतच शून्य अपघात मृत्युदर साध्य करण्यासाठी येत्या तीन वर्षाचा जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करून प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी संबंधित विविध यंत्रणांना दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर व अमरावती विभागातील रस्तेसुरक्षा तसेच अपघात नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात मुख्य सचिव सौनिक यांनी आढावा घेतला. रस्त्यावरील शुन्य अपघात मृत्युदर साध्य करण्यासाठी सेव्हलाईफ फाऊंडेशनसह विविध संस्थांसोबत वर्ष 2028 पर्यंतचा कृती आराखडा तयार करावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त आंचल गोयल, पोलीस उपायुक्त वाहतूक अर्चित चांडक तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्याचे वाहतूक आयुक्त विवेक भिमनवार, सेव्हलाइफ फाऊंडेशनचे पियुष तिवारी, नागपूर-अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका आयुक्त उपस्थित होते.

रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी व परिणामकारक उपाययोजना राबवितांना सकाळी 6 ते 10 व रात्री 6 ते 9 यावेळात होणारे अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक, अपघात प्रवण स्थळाच्या ठिकाणी रस्ते विभाजक, साईनबोर्ड तात्काळ लावावेत. वेग मर्यादा, हेल्मेट व सिटबेल्ट यासारख्या आवश्यक सूचना देतांनाच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना करतांना मुख्य सचिव म्हणाल्या की,  विभागात महसूल पोलीस, परिवहन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचे  प्रमाण कमी झाले आहेत.

अपघातानंतर गोल्डन अव्हरमध्ये वैद्यकीय सुविधा तसेच औषोधोपचारासाठी शासकीय रूग्णालयासोबतच खाजगी रूग्णालयातूनही उपचार उपलब्ध होईल यादृष्टीने अशा रूग्णालयांची नोंदणी करण्याला प्राधान्य देण्यात यावे. रूग्णालयात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसोबतच अपघातग्रस्तांना केंद्रशासनामार्फत सात दिवसांपर्यत दिड लाख रूपयांचा उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

शहरातील गर्दीच्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील तसेच फुटपाथवरील अतिक्रमण तात्काळ काढण्याच्या सूचना करतांना अंधार असलेल्या रस्त्यांवर विद्युत व्यवस्था, वेग मर्यादेसाठी आवश्यक उपाययोजनेसह आवश्यक मार्गदर्शक फलक लावण्याला प्राधान्य देण्यात यावे. यासाठी परिवहन व महानगरपालिकांने विशेष दक्षता घ्यावी यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आवश्यक निधी उपलब्ध करून घ्यावा, अशा सुचना यावेळी श्रीमती सौनिक यांनी केल्या.

परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी नागपूर-अमरावती विभागात रस्त्यावरील अपघातांमध्ये सरासरी तीन टक्के कमी झाले आहे. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत असून रस्तेसुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे. परिवहन विभागातर्फे यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते सुरक्षा समितीच्या सुचनेनुसार प्राधान्याने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सादरीकरणाद्वारे नागपूर जिल्ह्यात रस्ते अपघात कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने कमी होत असून 2.22 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात मदत झाली आहे. यासाठी मुख्यरस्त्यांवर आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात मदत झाली आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी शहरात 23 अपघात प्रवण स्थळांपैकी 18 ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्यामुळे सुमारे 75 टक्क्यांपर्यंत अपघात कमी झाले आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 47 कोराडी नाका ते भारत माता चौक, जामठा टि पॉइंट, राष्ट्रीय महामार्ग 53 उमिया आदींचा समावेश आहे.

प्रारंभी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रस्ते अपघातासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.