‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त कविता स्पर्धेस उत्तम प्रतिसाद

नवी दिल्ली, 23 : राजा शिव छत्रपती शिवाजी……, मनाचे श्लोक……, मराठी महिन्याचे महत्व सांगणारी कविता, माझ्या पप्पांनी गणपती आणला… बहीण माझी छोटीशी…. अशा सुप्रसिद्ध मराठी कविता, गाणी व श्लोक अस्खलितपणे  अमराठी भाषिक विद्यार्थ्यांनी कविता स्पर्धेत सादर केल्या.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत येथील नूतन मराठी शाळेत कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाचवी ते नववीपर्यंतच्या एकूण 20  विद्यार्थी सहभागी झाले. शाळेचे प्राचार्य गुलशन नागपाल यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका श्रीमती वर्षा बावने आणि श्रीमती सुषमा पानसे यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  व विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला.

अमराठी  भाषिक असणाऱ्या या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून मराठी कविता उत्तम रीतीने सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी तृतीय पारितोषिक दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले.  तसेच, सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

इयत्ता आठवीच्या वर्गातील निखल या विद्यार्थ्यांने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज….. या कवितेचे अभिनयासह उत्कृष्टपणे सादरीकरण केले.  इयत्ता आठवीतील तन्मय याने आई करना ग भेळ…. ही बाल कविता अभिनयासह सादर केली. तो द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. इयत्ता सहावीतील अनु या विद्यार्थीनीने मराठी महिन्याचे महत्त्व सांगणारी  कविता उत्साहात  सादर केली. तर इयत्ता सातवीतील आकांक्षी हिने ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’….. हे गाणे सादर केले. या दोन्ही विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.

या कविता स्पर्धेस परीक्षक म्हणून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक भागवंती मेश्राम आणि माहिती अधिकारी अंजु निमसरकर उपस्थित होते.

0000

अंजु  निमसरकर, मा.अ. वि.वृ.क्र.16 /दि. 23.01.25