धुळे, दिनांक २६ जानेवारी, २०२५ (जिमाका वृत्त) : केंद्र व राज्य सरकारच्या सहाकार्याने धुळे जिल्ह्यास अधिक विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात येईल. तसेच नाविन्यपूर्ण योजना व पथदर्शी प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वागिण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताकाचा ७६ व्या दिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार मंजुळाताई गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक नितीन सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार, मनपा आयुक्त अमिता दगडे- पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील चंद्रशेखर देशमुख, सीमा अहिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी, जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार यांच्यासह स्वातंत्रसैनिक, लोकप्रतिनिधी, नागरीक, खेळाडू, विद्यार्थी, माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार रावल पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्याला सुजलाम, सुफलाम बनविण्यासाठी सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेद्वारे तापी नदीचे पाणी जामफळ धरणात आणून ते ‘बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ च्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांना भूमिगत पाईपलाईनद्वारे पुरविण्यात येणार आहे. बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया पुर्ण झाली असून रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. तर मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. या रेल्वेमार्गांमुळे मध्य व पश्चिम रेल्वे जोडली जाणार असून जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गामुळे उपलब्ध होणाऱ्या दळणवळणाच्या सुविधांमुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळून मोठया प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, आपल्या जिल्ह्यासाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे, साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनसंवर्धक चैत्रामजी पवार यांच्या जल, जंगल, जमीन या क्षेत्रातील कामगिरीची नोंद घेऊन केंद्र सरकारने त्यांना पर्यावरण व वनसंवर्धन या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर केला याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले तर पद्मश्री चैत्राम पवार यांचे राज्य शासनाच्यावतीने तसेच संपूर्ण जिल्हावासियांच्यावतीने अभिनंदन केले
महायुती सरकारने नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात ५ लाख २७ हजारापेक्षा अधिक अर्ज मंजूर करण्यात आले. पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयेप्रमाणे जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंतच्या सात हप्त्यांची रक्कम खात्यावर जमा केली आहे. राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. या योजनेत जिल्ह्यात २ हजार ८१९ उमेदवांराची निवड करुन त्यांना आतापर्यंत ३ कोटी ७८ लाख रुपये मानधन दिले. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहायक साधने खरेदीकरीता प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात येत असून जिल्ह्यात १४ हजार अर्जांना मंजुरी दिली आहे. राज्यातील सर्व धर्मियांच्या ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील १ हजार लाभार्थ्यांना लवकरच तीर्थक्षेत्र भेटीचे नियोजन आहे. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ३ गॅस सिलेंडर मोफत भरुन मिळणार आहे. राज्यातील उच्च शिक्षणासाठी प्रवेशित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ योजनेत शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पुढील ५ वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे.
बळीराजासाठी हिताचे निर्णय
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ योजनेत धुळे जिल्ह्यातील ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या ९१ हजार शेतकऱ्यांना १०६ कोटी रुपयांची वीज बिल सवलत देण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ४१ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसानीबाबत 1 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना ३० कोटी रुपये विमा रक्कम नुकसानीपोटी वितरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना २ हजार रुपये प्रति हप्त्याप्रमाणे आतापर्यंत १८ हप्ते, तर नमो शेतकरी महासन्मान योजनेत ५ हप्ते वितरीत केले आहे. जिल्ह्यात कापूस व सोयाबीन उत्पादक १ लाख ७० हजार शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपयाप्रमाणे ६६ कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेतंर्गत ६ हजार ३७० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर स्वंय संचलित बॅटरी फवारणी पंपाचे तसेच १५ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना नॅनो युरीया व नॅनो डीएपी नि:शुल्क वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेत अनुसूचित जातीच्या ९८ शेतकऱ्यांना नवीन विहिरीकरीता १ कोटी ६७ लाख तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत अनुसूचित जमातीच्या २२३ शेतकऱ्यांना ४ कोटीपेक्षा अधिक अनुदान वितरीत केले आहे. खरीप हंगामात केंद्र शासनाच्या हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात ५ केंद्र सुरु करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत ३९९ विद्यार्थ्यांना १ कोटी ६८ लाख इतकी रक्कम वितरीत केली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजनेत जिल्ह्यातील १ हजार ९४१ मुलींना प्रती ५ हजार रुपयाप्रमाणे पहिल्या हप्त्याची ९७ लाखाची रक्कम वितरीत केली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतंर्गत नियमित मुदतीत कर्जफेड करणाऱ्या २७ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना ६ कोटी रुपये वितरीत केले.
कामगार, विद्यार्थी, दिव्यांगांसाठी विविध उपक्रम
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जिल्ह्यातील १६ हजारापेक्षा अधिक बांधकाम कामगारांना ११ हजारापेक्षा अधिक सुरक्षा व अत्यावश्यक संचाचे वाटप केले आहे. आदिवासी विकास विभागाच्या न्युक्लीअस बजेट योजनेअंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नि:शुल्क जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र काढुन देण्यात आले. नृत्यपथकांना साहित्य खरेदी, पारधी समाजाला मोफत जातीचे दाखले, शासकीय आश्रमशाळेतील 3 हजार विद्यार्थ्यांना बौद्धीक क्षमतेच्या विकासासाठी टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन, स्वंयरोजगारासाठी डीजी स्मार्ट सर्व्हिस सेंटर सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २८३ दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. दिव्यांगासाठी जिल्हा परिषदेमार्फत २१ प्रकारानुसार दिव्यांगाचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून या सर्व्हेक्षणानुसार विविध विकास योजना राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा दोन मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी झाल्या. यात खाजगी व्यवस्थापन गटातून पिंपळनेर येथील कर्मवीर आ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे ३१ लाखाचे तर शासकीय व्यवस्थापन गटातून शासकीय विद्यानिकेतन, धुळेस विभागस्तरावरील प्रथम क्रमांकाचे २१ लाखाचे पारितोषिक मिळाले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ३० हजार घरकुलांना मंजुरी
राज्यात १ जानेवारी ते १० एप्रिल, २०२५ या १०० दिवसाच्या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ३० हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली. तसेच शबरी आवास योजनेत १२ हजारापेक्षा अधिक, रमाई आवास योजनेत २ हजारापेक्षा अधिक तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अतंर्गत ६४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत आतापर्यंत ६० हजार ७२ घरकुले पूर्ण करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत जिल्ह्यात १४ हजार ६०० महिला बचतगटांच्या माध्यमातून जवळपास २ लाख कुटूंबे जोडली गेली आहेत. या बचतगटांना गेल्या पाच वर्षांत बॅकांमार्फत ५५० कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले आहे. पंतप्रधान महोदयांच्या लखपती दिदी या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत यावर्षी जिल्ह्यात ४८ हजार महिला लखपती झाल्या असून ६१ हजार महिला लखपती करण्याचे नियोजन आहे.
नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम
सामान्य नागरीकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. निर्णय प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी शासनाने ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरु केला आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय ते तालुका स्तरापर्यंत ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरु असून आतापर्यंत ३८ हजार फाईल्स तयार केल्या असून संपूर्ण कामकाज ई ऑफिसद्वारे सुरु आहे. नागरिकांच्या सोईसाठी लवकरच पालकमंत्री संपर्क कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेतंर्गत जिल्ह्यात ८४ अतिक्रमित व पाणंद रस्त्यांचा शोध घेण्यात आला असून ३९ रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले असून उर्वरित कार्यवाही सुरु आहे. आपल्या जिल्ह्यात ४५८ तलाठी व मंडळ कार्यालये अस्तित्वात आहे. पैकी स्वत:ची इमारत नसलेल्या १८७ कार्यालय बांधकामास गतीमान प्रशासन योजनेतंर्गत बांधकामास मान्यता मिळाली असून ३१ कार्यालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे तर १३२ कार्यालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात २ हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपली नोंदणी लवकरात लवकर करुन घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री रावल यांनी यावेळी केले.
यांचा झाला सन्मान….
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यावतीने ध्वज निधी संकल्प योजनेतंर्गत उत्कृष्ट ध्वज निधी संकलन करुन १०० टक्के इष्टांक साध्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले.
सन २०२३-२०२४ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्काराबद्दल श्री. कैलास वाघ, श्री.अविनाश पाटील, श्री.उमाकांत गुरव यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यात द्वितीय आल्याबद्दल कर्मवीर आ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे तसेच नाशिक विभागस्तरावर प्रथम आल्याबद्दल शासकीय विद्या निकेतन, धुळे यांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान केला.
जिल्हा आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र बोरीस, ता. धुळे यांना राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार तसेच नितीन जाधव, पोलीस पाटील, रा. बभळाज, ता.शिरपूर यांना राज्यपाल पुरस्कारासाठी उल्लेखनिय शौर्य पुरस्काराकरिता अंतिम निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे द्वारा सन २०२२ या वर्षांसाठी जिल्हा गुणवंत खेळाडु (पुरुष) पुरस्कार परेश अनिल पाटील यांना तर जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून जितेंद्र संतोषराव ठाकरे यांना प्रत्येकी १० हजार रुपये, सन्मान चिन्ह व गौरवपत्र देऊन मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. युतिका विशाल भामरे यांच्या उत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. महसुल विभागामार्फत ॲग्रीस्टॅक योजनेतंर्गत शेतकरी माहिती संच निर्मितीमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविल्याबद्दल जिल्ह्यातील निमगुळ येथील शेतकरी अजय नथ्थु मराठे, विजय दयाराम मोरे, होळ, ता. शिरपूर येथील विजयकुमार नागोसिंग सिसोदिया, मालपुर, ता. शिंदखेडा येथील सुरेश हरचंद सावंत आणि पाटण येथील शेतकरी अभिजित ज्ञानेश्वर पवार या शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमाक ६, धुळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे जिल्हा पोलीस दल (पुरुष), धुळे जिल्हा पोलीस दल (महिला), पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे, होमगार्ड (पुरुष व महिला), छत्रपती शिवाजी सैनिक विद्यालय, मोराणे, एस.पी.सी बॉईज शासकीय विद्यानिकेतन, धुळे, न्यु सिटी हायसकुल, धुळे, ऍथनी कॉन्व्हेट हायस्कुल, एनसीसी पथक, कनोसा कॉन्व्हेट हायस्कुल, केंद्रीय माध्यमिक निवासी आश्रमशाळा, जो.रा.सिटी हायस्कुल, धुळे, कमलाबाई शंकर कन्या हायस्कुल, राष्ट्रीय सेवा योजना, धुळे पोलीस व एसआरपीएफ संयुक्तीक बँड पथक, श्वान पथक (सॅम) तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरीकांना होण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ आदीनी संचलनात सहभागी झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
यानंतर विविध शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यात बालन सर मुलींचा गटांने शिव तांडव, भरत नाट्यम नृत्य, एस.व्ही.के.एम. शाळा, धुळे यांच्यावतीने शहिद जवान नाट्यावर आधारीत नृत्य, आंबेडकर शाळेच्यावतीने आदिवासी संस्कृती दर्शन व लोकनृत्य, जे.आर.सिटी हायस्कुल, धुळे विद्यार्थ्यांनी मलखांब, चावरा इंगलीश मेडीयम स्कुल, धुळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य, कै.मो.ता.पाटील हायस्कुल, वारकुंडाणे यांनी वारी नृत्य, तसेच राहुल मंगळे व ग्रुपने देशभक्तीपर गीत व पंजाबी भांगडा नृत्य सादर केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धुळे आकाशवाणीच्या पुनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.
३१ तलाठी तर १० मंडळ कार्यालयांचे पालकमंत्र्याच्या हस्ते ई-लोकार्पण
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज शिंदखेडा तालुक्यातील १९ तलाठी कार्यालय, ७ मंडळ कार्यालय व शिरपूर तालुक्यातील १२ तलाठी कार्यालय व ३ मंडळ कार्यालयांचे ई-लोकार्पण करण्यात आले.
जिल्ह्यात ४५८ तलाठी व मंडळ कार्यालये अस्तित्वात आहे. पैकी स्वत:ची इमारत नसलेल्या १८७ कार्यालय बांधकामास गतीमान प्रशासन योजनेतंर्गत मान्यता मिळाली आहे. शिरपूर तालुक्यातील २० तलाठी कार्यालय बांधकामासाठी ६ कोटी ४९ लाख तर शिंदखेडा तालुक्यातील ५० तलाठी कार्यालय बांधकामासाठी १५ कोटी रुपयांचा निधी, तर शिरपूर तालुक्यातील ५ मंडळ कार्यालय बांधकामासाठी २ कोटी तर शिंदखेडा तालुक्यातील १० मंडळ कार्यालयासाठी ४ कोटी निधी खर्च करण्यात आला आहे.
या गावातील कार्यालयांचे झाले ई-लोकार्पण
शिरपूर तालुक्यातील मांडळ, गिधाडे, जातोडे, हिंगोणी (बु), भटाने, मांजरोद, होळनांथे, उंटावद, वाठोडा, सावळदे, आढे(पिंप्री), करवंद, तसेच शिंदखेडा तालुक्यातील मालपुर, देगाव, कर्ले, चौगाव (बु), खर्दे (बु), देवी, चिलाने, निमगुळ, टाकरखेडा, गोराणे, तामथरे, दराने, पाटण, दभाषी, झोतवाडे, मुडावद, पढावद, वारुड भडणे या नवीन तलाठी कार्यालयांचे तसेच शिरपूर तालुक्यातील अर्थे, जवखेडा, बोराडी तसेच शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा, शेवाडे, विखरण, विरदेल, विखरण, शिंदखेडा व खलाणे या नुतन मंडळ कार्यालयांचे ई-लोकार्पण संपन्न झाले.
00000