- लातूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन उत्साहात
- नागरिकांना जलदगतीने सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
लातूर, दि. २६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासनिक विभागांसाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा जाहीर केला आहे. या अंतर्गत १५ एप्रिल २०२५ पर्यंत जिल्ह्यातील महत्त्वाची विकासकामे गतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासोबतच नागरिकांना जलदगतीने सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणे, हा देखील या उपक्रमाचा भाग असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी आज येथे सांगितले.
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबीय, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता, माजी सैनिक, पत्रकार, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानच्या टप्पा दोनमध्ये १२८ गावांमध्ये जलसंधारणाची १४३ कोटी ५९ लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापैकी २ हजार १४२ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातून होत असलेल्या कामांमुळे तलावांच्या साठवण क्षमतेत लाखो लिटरची भर पडली आहे. जिल्ह्यात सुरु असलेली जलसंधारणाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा जलद आणि सोप्या पद्धतीने लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी केंद्र शासनाने अॅग्रिस्टॅक योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येत असून त्यासाठी जिल्ह्यात मोहीम स्वरुपात शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचे पालकमंत्री ना. भोसले म्हणाले. तसेच जिल्ह्यात जवळपास १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री वीज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे ते म्हणाले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनेचीही त्यांनी माहिती दिली.
महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या इतिहासात लातूर जिल्ह्याचे विशेष महत्त्व आहे. विविध क्षेत्रात नावलौकिक असलेल्या या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्याचा मनस्वी आनंद आहे. सामाजिक सलोखा, वैचारिक अधिष्ठान व सांस्कृतिक श्रीमंती ही जिल्ह्याची ओळख आहे. आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी सर्वजण एकत्र येवून करूया, असे आवाहनही पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आदर्श असे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आले, हा इतिहासातील सुवर्णक्षण आहे. भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर ते आपल्या लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे. संविधानाच्या रचनेमागे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी, अजोड बुद्धीमत्ता आणि लोकशाही मूल्यांवरील निष्ठा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आपण एका आदर्श संविधानाने समृद्ध झालो आहोत, अशी भावना पालकमंत्री श्री. भोसले यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करून संविधानाचे महत्त्व जनमानसात पोहोचवण्याची प्रेरणा दिली असल्याचे मंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले.
पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी पोलीस परेडचे निरीक्षण केले. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सागर खर्डे यांनी पोलीस परेडचे नेतृत्व केले. पोलीस पथकांसह गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, पोलीस बॅण्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका, यासह विविध शासकीय विभागांचे १६ चित्ररथ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस, सामाजिक वनीकरण विभागाचा आकर्षक देखावा असलेला रथ या पथसंचालनात सहभागी झाला होता.
प्रजासत्ताक दिन सोहळ्याला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांची पालकमंत्री श्री. भोसले यांनी भेट घेवून त्यांचा सत्कार केला, तसेच त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशासनाच्या विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच अॅग्रिस्टॅक योजनेमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात नोंदणी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
हर घर संविधान अभियान अंतर्गत समाज कल्याण विभागाच्यावतीने नागरिकांना प्रातिनिधिक स्वरुपात भारतीय संविधानाची प्रत वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सदानंद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.
०००