विशेष मोहीम राबवून खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश

राहाताश्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या समस्यांचा आढावा 

शिर्डी, दि. 7 : शेत जमिनी खंडकरी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

राहाता, श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी श्रीरामपूर येथे प्रशासकीय भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महसूलमंत्री बोलत होते. खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार सुधिर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, शेती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बागवे, श्रीरामपूरचे उपविभागीय अनिल पवार, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शिवाजी जगताप यावेळी उपस्थित होते.

शेती महामंडळाची जमीन खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करताना येणाऱ्या समस्या आणि अडचणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठकीत जाणून घेतल्या. ज्या शेतकऱ्यांना जमिनी मंजूर झाल्या आहेत त्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी प्राधान्याने रस्ता उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. न्यायप्रविष्ट प्रकरणे आणी गावातच जमीन हवी या आग्रहामुळे जमिनी वाटप करताना अडचणी निर्माण होतात असे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. कौटुंबिक वाद त्वरित सोडविल्यास शेतकऱ्यांना जमीन वाटप करणे शक्य आहे अशी सूचना त्यांनी केली. शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या जमिनीची मोजणी एका महिन्यात पूर्ण करण्याची सूचनाही यावेळी त्यांनी केली. प्रशासनाला या संदर्भात कायदेशीर बंधने आहेत याची जाणीव शेतकर्यांनी ठेवावी असे सांगून या व अन्य समस्यांचा नियमित आढावा घेऊन त्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील असे सांगितले.

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरातील लक्ष्मीबाई नारायण शिंदे, कारभारी किसन तुपे, पीरमोहम्मद उस्मान जहागिरदार आणि इमाम अब्दुल वहाब यांना प्रातिनिधिक स्वरूपात शेत जमिनीचा सात बारा उतारा श्री. थोरात हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला. 999 खंडकरी शेतकर्यांनी शेती महामंडळाची जमीन मिळावी यासाठी अर्ज केले असून 773 शेतकरी पात्र ठरले आहेत. सुमारे सात हजार पाचशे त्रेपन्न एकर जमीन वाटप करण्यात येणार आहे. आमदार लहू कानडे यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात घरकुलांचा प्रश्न सुटण्यासाठी हद्द वाढीचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा असे आवाहन केले.

बैठकीला महसूल विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग, पंचायत समिती, भूमी अभिलेख विभाग व नगररचना विभागाचे अधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.