अकोला दि. १६- कोरडवाहू शेती करताना येणाऱ्या अडचणी, समस्या तसेच त्यातील उत्पादन वाढीकरिता उपाययोजना करुन कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी, कृषी विद्यापीठाने तज्ज्ञ लोकांची संशोधन समिती स्थापन करावी, अशी सूचना पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केल्या.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी हॉल मध्ये कृषी विद्यपीठ व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त आढावा बैठकीत कडू हे मार्गदर्शन करत होते. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाघमारे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कडू म्हणाले, कृषी विद्यापीठाने बियाणे, खते तसेच मार्केटिंग यासारख्या प्रश्नांवर कार्य करावे. पीक उत्पादनवाढीसोबत शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, यासाठी विद्यापीठाने संशोधन करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट करुन शासनाकडे सुस्पष्ट व पारदर्शक अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात आपली भूमिका मांडताना कडू म्हणाले, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर सिताफळ, पेरु, जांभुळ यासारख्या कमी पाण्यात येणाऱ्या फळपिकाची लागवड करावी, उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव काढताना विद्यापीठाने परंपरागत पद्धतीचा वापर न करता नवीन पद्धतीचा अवलंबन करावे. कोरडवाहू शेतकऱ्यांसोबत संत्रा उत्पादक, व केळी उत्पादक तसेच इतर पिकाचे उत्पादन घेणारा शेतकरी कोणत्या परिस्थितीमुळे अडचणीत आला? यावर संशोधन करावे. तसेच उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पन्न देणारी शेती करण्यासाठी विद्यापीठाने संशोधन करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री श्री. कडू यांनी सांगितले.