बीड, दि. 29 (जि. मा. का.): बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कृषी व अकृषी कर्ज पुरवठा सुरु ठेवण्यासाठी राज्य सहकारी बँकच्या माध्यामातुन 300 कोटी रुपयांचे सॉप्टलोन सवलतीच्या दरात देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध अडचणीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीस दिल्ली येथून ते दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.
त्याचबरोबर बँकेच्या शाखांमध्ये आधुनिक भौतिक व तांत्रिक सुविधा निर्मितीसाठी 15 कोटी रुपयांची विशेष मदत शासनाने करावी आणि जिल्हा बँकेचे शासनाच्या विविध सवलत योजनेतील बाकी असलेले येणे शासनाने लवकरात लवकर अदा करावे, अशी विनंती केली.
या सर्वच विषयी अर्थ व नियोजन विभाग, राज्य सहकारी बँक, नाबार्ड यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसेच सहकार विभागामार्फत बँकेसाठी एक तज्ज्ञ अधिकारी दिला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.
या बैठकीस अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांसह अर्थ व नियोजन विभाग, राज्य सहकारी बँक तसेच नाबार्डचे अधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक तसेच जिल्हा बँकेचे प्रशासकीय मंडळ आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी प्रशासक मंडळाच्या कामाचे कौतुकही केले.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल श्री. मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.
०००