लोकसहभागातून मूलभूत सुविधांच्या कामांना अधिक प्राधान्य देणार : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

नाशिक, दि. 1 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): नागरिकांना रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लोक सहभागातून या कामांना अधिक प्राधान्य देणार, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

आज दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील कादवा सहकारी साखर कारखान्याचे हंगाम 2024-25 मधील दोन लाख एक हजार साखर पोत्यांचे पूजन व प्राथमिक विद्यामंदिर राजारामनगर वास्तु स्थलांतर प्रवेश सोहळाअन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री श्री.झिरवाळ यांचे हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी, ‘कादवा’चे चेअरमन  श्रीराम शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते,’कादवा’चे  प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांच्यासह संचालक मंडळ सदस्य, सभासद शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री झिरवाळ म्हणाले की, साखर कारखान्यासाठी आवश्यक ऊसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना वीज व पाणी हे अत्यावश्यक घटक आहेत. यासाठी एकदरे वळण बंधारा आराखड्यास येणाऱ्या काळात अंतिम स्वरूप मिळणार आहे. तसेच पेठ तालुक्यात एम.आय.डी.सी व रस्ते परवानगीचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी अन्नपदार्थ होणारी भेसळ रोखण्यासाठी 40 अन्नपदार्थ तपासणी व्हॅन कार्यान्वित होणार असून या अन्न नमुनेचे तपासणी अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी विभाग स्तरावर सहा प्रयोगशाळा स्थापित होणार आहेत.
आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या दृष्टीने वणी येथील सप्तशृंगी तीर्थक्षेत्र विकास  तसेच करंजी येथे शिवसृष्टी साकारण्यासाठी चर्चा करणार असल्याचे मंत्री श्री. झिरवाळ यावेळी सांगितले.

यावेळी ‘कादवा’चे चेअरमन  श्रीराम शेटे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कादवा सहकारी कारखान्याचे आद्य संस्थापक कर्मवीर राजाराम वाघ यांच्या पुतळ्यास मंत्री नरहरी झिरवाळ यांनी माल्यार्पण केले. यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कादवा सहकारी साखर कारखान्याचे सभासदांच्या वतीने कादवा कार्यस्थळावर भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
000000