निरोगी शरीरासाठी नियमित व्यायाम आवश्यक -पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे मॅरेथॉन सिझन-३ ला अभूतपूर्व प्रतिसाद; राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडू, कलाकारांसह ३१ हजारावर स्पर्धकांचा सहभाग

धुळे, दि. ०२ (जिमाका) : तरुणांचा देश असलेल्या भारतातील युवा-युवती सुदृढ राहिल्या तर देश बलवान होईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया, फिट इंडियाचा नारा दिला. याला अनुसरुन प्रत्येक तरुणाने आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. धुळे पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासन, महापालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉन स्पर्धा 2025 सिझन-3 चा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

धुळे जिल्हा पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉन स्पर्धा-2025 च्या सिझन -3 ‘फिट धुळे, हिट धुळे’ तसेच ‘ग्रीन धुळे, क्लीन धुळे’ या घोषवाक्यासह ही स्पर्धा शहरात तिसऱ्यांदा पार पडली. शहरातील पोलीस कवायत मैदान येथून स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेत राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडू, कलाकारांसह 31 हजाराहून अधिक स्पर्धंकांनी सहभाग घेतला. सकाळी धुळे मॅरेथॉनचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून झाले. याप्रसंगी यावेळी मंत्री श्री. रावल, पद्मश्री चैत्राम पवार, आमदार अनुप अग्रवाल,  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम, अभिनेता अजय पुरकर, विनोदी हास्य कलाकार चेतना भट, श्याम राजपूत, युवा प्रेरणास्त्रोत व फिटनेस तज्ञ वैभव शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नागरिकांसह खेळाडू उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल पुढे म्हणाले, रोजच्या जीवनात व्यायामाला महत्त्व असून नियमित व्यायामाने शरीर सुदृढ तर होतेच शिवाय आरोग्य देखील सुदृढ राहते. आपल्याला नवीन पिढी घडवायची असून यासाठी तरुणांनी फिट इंडियाचा नारा दिला पाहिजे असे आवाहन केले. धुळे मॅरेथॉनला नागरीकांचा प्रतिसाद पाहता ही स्पर्धा लवकरच देशपातळीवर पोहोचेल. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करतांना यापुढील स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वच्छता व पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. यावेळी विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम यांनीही उपस्थितांना आपण फिट राहिलात तर आपला धुळे जिल्हा, महाराष्ट्र राज्य व देश फिट राहील असा संदेश देत तरुणांनी खेळाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

पद्मश्री चैत्राम पवार यांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार

यावेळी केंद्र सरकारने धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनसंवर्धक चैत्राम पवार यांच्या जल, जंगल, जमीन व सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची नोंद घेऊन त्यांना पर्यावरण व वनसंवर्धन या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते मॅरेथॉनचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

ही स्पर्धा 21, 10, 5, 3 किलोमीटर अशा हाफ मॅरेथॉन, टायमिंग रन, ड्रीम रन, फॅमिली रन विभागात पार पडली. मॅरेथॉन बारापत्थर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून जुना आग्रा रोड वरुन मोठ्यापुलामार्गे दत्त मंदिर चौक, जिल्हा क्रीडा संकुल, गोंदुर रोड, स्टेडीयम येथून त्याच मार्गाने पुन्हा पोलीस कवायत मैदान अशी झाली. धुळे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील स्पर्धकही मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. विजेत्यांना पदक, प्रमाणपत्र व रोख बक्षिस मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

 

०००