परदेशात मराठीचे जतन, संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार- मंत्री उदय सामंत

तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची सांगता; पुढील संमेलन नाशिकला

पुणे, दि. ०२: राज्य शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता परदेशात आपली मराठी माणसे मराठीचे संवर्धन, जतन करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन या परदेशातील मराठीचे काम करणाऱ्या संस्थांच्या मागे राज्य शासन आर्थिक ताकत निश्चितपणे उभी करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्र उदय सामंत यांनी दिली. पुढील वर्षात होणारे चौथे विश्व मराठी संमेलन हे नाशिक येथे आयोजित करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी रितेश देशमुख यांना पहिला ‘विश्व मराठी संमेलन- कलारत्न पुरस्कार’ देण्यात आला.

मंचावर राज ठाकरे, सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, माजी आमदार उल्हास पवार, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे आदी उपस्थित होते.

मराठी भाषेचा मंत्री असणे यामुळे मी मला भाग्यवान समजतो, अशी भावना व्यक्त करुन मंत्री श्री. सामंत म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ही 2 हजार वर्षापूर्वीची असल्याचे पुरावे केंद्राकडे सादर करण्यासाठी 12 वर्षे लागली. परंतु, गतवर्षी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता राज्याच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा विभागाला भरीव तरतूद करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

या संमेलनासाठी परदेशातून आलेल्या मराठी माणसांना येण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, यापैकी 80 टक्क्याहून अधिक जणांनी ही मदत नाकारली असून ती रक्कम मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषा विभागाने वापरावी असे सांगितले आहे. हे मराठी माणसाचे मोठेपण आहे, असेही श्री. सामंत म्हणाले.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, इतर देश, राज्यातील लोक जसे आपल्या भाषेवर ठाम राहतात, त्याप्रमाणे मराठी माणसाने आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे. आपल्या साहित्यिकांनी मार्ग दाखविला पाहिजे, बोलले पाहिजे. चांगले- वाईट समाजाला सांगितले पाहिजे. साहित्यिक जेव्हा बोलतील, तेव्हा लोक त्यांना ऐकतील आणि त्यांची पुस्तकेही वाचतील; आणि पुस्तकांतून प्रबोधन होईल. तरुणांनी पुस्तके वाचली पाहिजेत. पुस्तकांचा आणि ज्ञानाचा प्रचार प्रत्येक मराठी घरात गेला पाहिजे. महाराष्ट्र हा मराठी भाषिक म्हणून एकत्र आला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

अभिनेते श्री. देशमुख म्हणाले, मराठी घरात जन्म घेणे हेच आपले भाग्य असते. आपण १० वर्षात हिंदी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर वडिलांनी मराठी चित्रपटांच्या अनुषंगाने विचारल्यानंतर ‘लय भारी’ हा चित्रपट केला जो प्रचंड लोकप्रिय ठरला. गेल्या १३ वर्षात केवळ मराठी चित्रपटांचीच निर्मिती केल्याचे श्री. देशमुख यांनी आवर्जून सांगितले.

आपले आयुष्य पुस्तकातून घडल्याचे सांगून अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, दुसऱ्याने सांगून विचार बदलत नसतात. आपण आपल्यापासून सुरुवात केल्यावरच बदल होऊ शकतो. आपल्याला इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करायचे असल्यास त्यातील संवाद हे मराठीतच लिहून घेतो आणि बोलतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

नवकल्पना आणि संशोधनाच्या आधारे ज्ञानाधिष्ठित भारताची निर्मिती करणे शक्य- डॉ. रघुनाथ माशेलकर

  • विश्व मराठी संमेलनात मराठी उद्योजकांच्या चर्चासत्राचे आयोजन

पुणे, दि. २:  संपूर्ण जगात ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेला खूप महत्त्व आहे; नवकल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाधिष्ठित भारताची निर्मिती  करुन मोठी मजल मारू शकतो, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

‘विश्व मराठी संमेलन – २०२५’ अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंच येथे आयोजित मराठी उद्योजकांच्या चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात ‘बीव्हिजी ग्रुप’चे प्रमुख हणमंतराव गायकवाड, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, गर्जे मराठी ग्लोबलचे आनंद गानू देखील सहभागी झाले होते. चर्चासत्राचे निवेदन जयू भाटकर यांनी केले.

जगामध्ये हवामान बदलाची समस्या मोठी असून त्यावर मात करण्यासाठी हायड्रोजन फ्युएल सेल व इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरी उत्पादनात भारतामध्ये सर्वात जास्त काम महाराष्ट्रात करण्यात येत आहे. त्यामुळे हरित ऊर्जेच्या तंत्रज्ञानात आपण जगात नेतृत्व करू शकतो, असे सांगून डॉ. माशेलकर म्हणाले, देशाच्या १५ टक्के औद्योगिक उत्पादन महाराष्ट्रात होते. तथापि, औद्योगिक उत्पादन क्षेत्रात संशोधनासाठी खूप कमी गुंतवणूक होत असते. त्यामुळे काल जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात खासगी क्षेत्रासाठी करण्यात आलेली २० हजार कोटी रुपयांची तरतूद खूप महत्त्वाची करणार आहे, असेही ते म्हणाले.

संशोधन हे पैशाचे ज्ञानात रूपांतर करते, तर नवकल्पना या ज्ञानाचे पैशांमध्ये रूपांतर करतात, असे सांगून ते पुढे म्हणाले, नवकल्पनांच्या आधारे स्टार्टअप निर्माण होण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. २०१६ मध्ये असलेली ४७६ च्या तुलनेत २०२१ मध्ये देशात ७० हजार स्टार्टअप निर्माण झाले आहेत. त्यातील २०१६ मध्ये वर्षाला त्यापैकी युनिकॉर्न स्टार्टअप निर्माण व्हायचा, मात्र २०२१ मध्ये दर आठवड्याला एक युनिकॉर्न येत आहे. त्यातही ५० टक्के हे महाराष्ट्रातील तिसऱ्या व दुसऱ्या स्तरातील शहरातून येत आहेत ही त्यातील आणखी विशेष बाब आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभ्या राहणे हे त्यामागील महत्वाचे कारण आहे, असेही ते म्हणाले.

शिक्षण हे भविष्य घडवते असे सांगून, तुम्ही कुठे जन्मलात, कोणाच्या पोटी जन्मला, आपल्या परिस्थितीत जन्मला याला महत्त्व नसते, तर तुमचे भविष्य तुमच्या हातात असते, असा मोलाचा सल्ला डॉ. माशेलकर यांनी तरुणांना दिला. पाच वर्षांपूर्वी नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी माशेलकर समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर आज एआयमुळे जगात खूप बदल झाला आहे. त्यामुळे केवळ ‘शिक्षणाचा हक्क’ याबाबतच नव्हे तर ‘योग्य शिक्षण’ आणि ‘योग्य मार्गाने शिक्षण’ यावरही भर द्यावा लागेल. तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने या शिक्षणाचा बदलणाऱ्या भविष्यामध्ये वेगळा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.

हणमंतराव गायकवाड यांनी दहा बाय दहाच्या खोलीतून झालेला आपल्या संघर्षमय जीवनाचा प्रवास उलगडून सांगितला. ते पुढे म्हणाले, टेल्को कंपनीमध्ये काम करत असताना काम करत असताना समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने ‘भारत विकास प्रतिष्ठान’ची स्थापना केली.  ‘बीव्हिजी’ या नाममुद्रेची स्थापना करून आपल्या गावच्या लोकांना मोठ्या कंपन्यांत स्वच्छतेचे काम दिले. पुढे राष्ट्रपती भवन, संसद, प्रधानमंत्री कार्यालय, सर्वोच्च न्यायालय, विमानतळे जागतिक महत्वाच्या कंपन्या आदी ठिकाणी सचोटीने, प्रामाणिकपणे काम करत स्वच्छतेचे काम मिळवले. प्रत्येकात पुढे जाण्याची प्रचंड ताकद आहे फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि रात्रंदिवस ध्यास घेतला पाहिजे, असा सल्ला त्यांनी युवा वर्गाला दिला.

आपली संस्था कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य तसेच आयुर्वेदामध्ये संशोधन करीत आहे. दहा कोटी लोकांच्या आयुष्यात बदल घडवणे, दहा लाख लोकांना काम देणे आणि शंभर देशात आपल्या संस्थेला घेऊन जाणे हे आपले स्वप्न आहे, असे सांगून श्री. गायकवाड पुढे म्हणाले, संपूर्ण जग विस्तारले आहे. ब्रिटिश राणीने ब्रिटिशांना जी प्रेरणा दिली होती की संपूर्ण जगात जाऊन राज्य करा, ती प्रेरणा आपल्या तरुणांनी घ्यायची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेतला पाहिजे. तसेच आपल्या मनातील कक्षा रुंदावल्या पाहिजेत. भारत सरकारने ‘बीव्हिजी’ बरोबर एक कंपनी स्थापन केली असून आता तीस लाख नोकऱ्या यातून उपलब्ध आहे. फक्त यासाठी घराचे स्वरूप आणि शिक्षण यातील तफावत भरून काढली पाहिजे, असेही ते म्हणाले.

श्री. गानू म्हणाले, परदेशात गेल्यावर आपल्या देशासाठी खूप काही करण्याची गरज आहे असे लक्षात आले. त्यावेळी दोन औषध कंपन्या स्थापन केल्या. यश, पैसे मिळत होते. परंतु, हे फक्त स्वतःसाठी करत असल्याची भावना होती. मग समाजासाठी काम केले पाहिजे ही भावना निर्माण झाली आणि २००५ पासून सामाजिक कार्य सुरू केले. त्यातून गर्जे मराठी ग्लोबल ना- नफा संस्थेची स्थापना केली. आज संस्थेत २५ देशातील १५ हजाराहून अधिक लोक एकत्र येऊन काम करत आहेत. जगभरातील मराठी माणसांचे जाळे निर्माण करणे, धडपडणाऱ्या कष्टाळू नव्या पिढीचे मार्गदर्शक बनणे, त्यांना उद्योजकता, व्यवसायासाठी मदतीची यंत्रणा करणे यासाठी काम करण्यात येत आहे. नव्या पिढीला उद्योगासाठी परदेशात जाण्यासाठी, परदेशातील आपल्या माणसांना भारतात उद्योगासाठी येण्यासाठी, नवीन उद्योग स्थापन करण्यास मार्गदर्शन करण्यास आपली संस्था तयार असून राज्य शासनही त्यासाठी आम्हाला मदत करत आहे, असेही ते म्हणाले.

श्री. शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि हक्क मिळविण्यासाठी, आपल्या कष्टाचे दाम मिळविण्यासाठी सकारात्मक मार्ग स्वीकारून शेतकऱ्यांना एकत्र केले आणि सह्याद्री फार्म्सची स्थापना केली. १० शेतकऱ्यांपासून सुरुवात करून आज २६ हजार शेतकरी या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद आहेत. ही सर्व सभासद शेतकरी मालक असलेली पूर्ण सहकारी तत्त्वावरील कॉर्पोरेट कंपनी आहे. टोमॅटो, द्राक्षे, भाजीपाला उत्पादनासाठी सभासदांना सर्व प्रकारचे सहाय्य, ताजा कृषी माल विक्री व्यवस्था, काढणीपश्चात प्रक्रिया यात काम करण्यात येत आहे. भारतीय शेतकरी जगामध्ये आपला झेंडा रोवू शकतो हे आपल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दाखविले आहे. कंपनीने पुढील काळात पूर्ण राज्यभरात पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यानुसार काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ. माशेलकर यांचा जीवनपट व कार्यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.

०००