जावली तालुक्यातील सर्व विकास कामांना गती देणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

सातारा दि. ०३ (जिमाका) : जावली तालुक्यातील सर्व विकास योजना, विकास कामे यांना गती देऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिह भोसले यांनी पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदी सर्व जन सुविधांबाबत विकास कामांचा व जनतेच्या समस्यांचा आढावा घेतला.

मंत्री श्री. भोसले यांनी जावली तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत जावली मेढा येथे तालुकास्तरीय बैठक घेतली यावेळी पोलीस अधिक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संतोष रोकडे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जलसिंचन विभागाचे जयंत शिंदे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. युवराज करपे, प्रांताधिकारी राजश्री मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा उद्योग केंद्राचे दंडगव्हाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फारांदे, उप मुख्‌य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापसिंह साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, यांच्यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अधिकारी, पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, नागरिक उपस्थित होते.


तालुक्याचे प्रश्न तालुक्यातच सुटावेत यासाठी तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणाले की, जल जीवन योजनेतील सातारा जिल्ह्यातील अनेक प्रस्ताव सुधारीत करण्याची आवश्यकता असून त्यासाठी पाठपुरावा चालू आहे. याबाबत पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. जावली तालुक्यात एकूण 128 जलजीवन योंजनेमधील कांमांना मंजूरी मिळाली होती. त्यापेकी 69 गावची कामे पूर्ण आहेत. 92 योजना सुधारीत कराव्या लागत आहेत. या सर्व कामांमध्ये अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून जलजीवन योजनेमधील कामे पूर्ण करावीत. पिण्याच्या योजनांना विद्यूत महावितरण कंपनीनेही ज्या ठिकाणी मागणी असेल त्याठिकाणी जोडणी देणे आवश्यक आहे.

पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरु होऊन त्या सुरु कशा राहतील याला प्राधान्य द्या

मंत्री श्री. भोसले म्हणाले, तालुक्यातील सर्व गावांच्या स्मशानभूमीपर्यंत जाणाऱ्या कामांचे क्राँक्रीटीकरण करण्यात येईल. त्यासाठी 67 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल. बोंडारवाडी या 1 टीएमसी धरणासाठी शासन सकारात्मक असून यामध्ये बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या तीन गावांच्या खातेदारांशी पुनर्वसनासाठी समजूत घालून  बोंडारवाडी धरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. सोळशी धरणातील एक मुख्य कालवा आंबवडेपर्यंत आला पाहिजे. त्यासाठी सोळशी धरणाला पूर्ण सहकार्य करु. मेढा येथे जुनी प्रशासकीय इमारत पाडून त्याठिकाणी नवीन भव्य प्रशासकीय इमारत उभारण्यात येईल. वाहगाव येथील प्रकल्पग्रस्तांच्या आर्थिक पॅकेजचा प्रस्ताव तयाार करुन शासनाकडे पाठविण्यात येईल. पण धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना कालव्याला पाणी जोडणीचे काम प्रकल्पग्रस्तांनी पुणे करु द्यावे. त्यास अडथळा निर्माण करुन नये, असे आवाहनही मंत्री श्री. भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी ज्यांना जमिन हवी असेल त्यांच्या जमिनीच्या प्रस्तावासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. दुर्गम भागासाठी नवीन बसेस मागविण्यात आल्या असून त्याही लवकरच उपलब्ध होतील. या बैठकीत रस्ते, शासकीय इमारती, शहीद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक बोंडारवाडी प्रकल्प, जलजीवनमधील कामे, नाना नानी उद्यान, पाणीपुरवठा, महिला स्वच्‌छतागृह, स्ट्रिट लाईट, पूल, पाणंद रस्ते आदी सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वीरगाथा पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा, शिक्षण विभागाकडील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रधानमंत्री आवास येजनेंतर्गत लाभार्थ्यांना मंजूरी प्रमाणपत्र, ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सन्मान पत्र, बामणोली गावठाण विस्तार योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातबारा वाटप, गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचे वारसांना वाटप करण्यात आले.

०००