लिंग समभावासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारताना येणाऱ्या आव्हानांवर ६ फेब्रुवारी रोजी चर्चासत्र

मुंबई, दि. ०४: लिंगसमभावासाठी संस्थात्मक यंत्रण उभारताना येणारी आव्हाने, अडथळे व कार्यपद्धतीबाबत ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.

बिजिंग परिषदेला ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जगातील सर्व देशांनी व राज्यांनी स्वीकृत केलेल्या कृती कार्यक्रमाला अनुसरून कृती कार्यक्रमांचा आढावा कमिशन ऑन स्टेटस ऑफ वूमन कडून संयुक्त राष्ट्रसंघ, न्यूयॉर्क येथे मार्च २०२५ मध्ये घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रात महिला व मुलींचे आरोग्य व प्रजननविषयक हक्क, महिलाविरोधी हिंसाचार प्रतिबंध करण्यासाठी स्थायी कार्यपद्धती, लिंग समभाव वाढविण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने तसेच लोकसहभागातून संस्थात्मक कार्यप्रणाली उभारणी, नागरी भागातील रोजगार, ग्रामीण भागात रोजगार हमी योजना आणि कौशल्य विकास कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण यावर यावेळी चर्चा होणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/