मुंबई, दि. ०५: वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे मे.फेअर फेस्ट मीडिया लि. यांच्या वतीने आशियातील सर्वात मोठा ट्रॅव्हल ट्रेड शो ‘आऊटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट २०२५’चे (ओटीएम) पार पडला. केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या ट्रेड शो मधील महाराष्ट्र दालनाला भेट दिली. त्यावेळी त्यांचे स्वागत पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांनी केले.
महाराष्ट्रातील 70 हून अधिक भागधारकांचा महाराष्ट्र दालनात सहभाग
जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हे प्रदर्शन 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडले. राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटनस्थळांची माहिती देखील ‘ओटीएम’च्या माध्यमातून देण्यात आली. महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत 70 हून अधिक भागधारक यामध्ये सहभागी होते. या प्रदर्शनामुळे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, त्या ठिकाणी जाण्याची सोय, उपलब्ध सेवा सुविधा इ. माहिती पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली. या दालनात पर्यटन स्थळांची माहिती व पर्यटन व्यावसायिकांशी परस्पर संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.
ओटीएम प्रदर्शनात दरवर्षी ६० देशांतील २,१०० प्रदर्शक, ३० राज्य आणि ४० हजारांहून अधिक भागधारक सहभाग घेतात. या ट्रॅव्हल ट्रेड शोमध्ये पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी देश-विदेशातील अनेक भागधारकांची दालने आहेत. देश-विदेशातील पर्यटन क्षेत्रातील परस्पर व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करणे व पर्यटनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
०००
संध्या गरवारे /वि.सं.अ/