ज्ञानसंपादनासाठी विद्यार्थ्यांनी वाचनकक्षा रुंदावणे गरजेचे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

मुंबई, दि.०५: युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे. वाचनातून प्रगल्भता येते. विविध विषयांतील माहिती व ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली वाचनकक्षा रुंदवावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथे आयोजित मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२४ ‘ कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि डॉ गोऱ्हे यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथोत्सवाचे उद्घाटन झाले.

प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्ष शीतल करदेकर, कार्यवाह रवींद्र गावडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, प्रत्येकाला मनासारखे वाचता येण्यासाठी स्वातंत्र्य हवे. मात्र काय वाचावे आणि काय बघावे यावर मुला-मुलींनी नियंत्रण ठेवावे. केवळ मोबाईलवर गुंतून न राहता रोज काहीतरी वाचन करावे, तरच लेखनामध्ये प्रगती होते. दुसऱ्याचे ऐकून घ्यायला शिकले पाहिजे. समाजमाध्यमावर व्यक्त होताना कायद्याच्या चौकटीत राहून लिहिण्याचा प्रयत्न करा नवीन लेखक तयार होत आहेत चांगल्या लेखनाचा अनुभव घ्या, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि इमारत दुरुस्ती पुनर्विकासासाठी निधीचा प्रस्ताव पाठवण्याबाबतही डॉ. गोऱ्हे यांनी सूचना केल्या.

शालेय जीवनातच मुलांना राष्ट्रपुरुष समजावेत यासाठी साहित्य संमेलने – मराठी भाषा मंत्री उदय सामंत

ग्रंथालयाकडे युवकांचा ओढा वाढविण्यासाठी ग्रंथ चळवळीने प्रयत्न करावेत. शालेय जीवनातच मुलांना राष्ट्रपुरुष समजण्यासाठी बाल, युवा आणि महिला साहित्य संमेलन यावर्षी राज्य शासनामार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मोबाईलबरोबर पुस्तक ऐकण्याची सुविधा आहे त्याचाही विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा. मराठी संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तके वाचून आत्मचिंतन करा. महाराष्ट्राची संस्कृती कशी घडली हे वाचा, ग्रंथ आणि ग्रंथालयाबद्दल अभिमान बाळगा. जिल्हा ग्रंथालयाने ग्रंथोत्सव भरविताना तो अधिक व्यापक स्वरुपात होईल असे नियोजन करावे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

इंग्रजी आणि हिंदी यायलाच हवे, मात्र मराठीचा विसर पडू नये. मराठी भाषेकडे आदराने बघावे, विश्व मराठी संमेलनामध्ये पुस्तक आदानप्रदानाचा उपक्रम घेण्यात आला. तो उपक्रम प्रत्येक ग्रंथालयाने राबवायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व ग्रंथालय डिजिटल करण्यावर भर देण्यात येत असून यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर उभारणार असून रायगड जिल्ह्यातील गावात ही शिवाजी महाराजांचा वैशिष्ट्यपूर्ण पुतळा उभा करण्यात येणार आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यटन विकास वाढीला चालना मिळेल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री. गाडेकर यांनी वाचन संस्कृतीच्या विकासासाठी ग्रंथालय संचालनालय कटिबद्ध असल्याचे सांगितले. आभार रवींद्र गावडे यांनी मानले तर सूत्रसंचालन अमेय रानडे यांनी केले.

तत्पूर्वी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर (पू.) मनपा अग्निशमन केंद्र, दादर-रणजित बुधकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज चौक, एस. एस. वाघ मार्ग-महात्मा गांधी चौक- महात्मा फुले रोड – शाहीर मधू कडू चौक या मार्गावरुन लेझिम आणि ढोलताशांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/