नागपूर, दि.05 : नागपूर जिल्ह्यातील कळमना तालुक्याच्या काठावरील उबाळी या सुमारे एक हजार उंबरठ्याच्या गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा रोजच्याप्रमाणे सकाळी सुरु झाली. शालेय प्रार्थना व पाठ होत असताना शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे शाळेच्या पाहणीसाठी शाळेत पोहोचतात. तिथल्या शांततेला व शिस्तीत शाळेच्या ओट्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांजवळ जातात. वडीलकीच्या नात्याने मुलांची चौकशी करतात.
खुद्द शालेय शिक्षणमंत्री यांच्या या शाळा भेटीने मुख्याध्यापिका विजया गोतमारे यत्किंचितही गोंधळून न जाता विश्वासाने पुढे येतात. शाळेची संपूर्ण माहिती त्या देतात. शिक्षणमंत्री इयत्ता तिसरीतील मुलींशी गप्पांमध्ये रमून जातात. त्यांना एक-एक प्रश्न विचारत शाळेतल्या अडचणी जाणून घेतात. कशिश ठाकूर ही विद्यार्थिनी त्यांनी दिलेल्या विश्वासावर पुढे येते. ‘सर मी कविता वाचून दाखविते असे सांगून लय धरते.
शाळेतल्या या सकाळच्या वातावरणाला नुकताच उत्तरायणाकडे कललेला सूर्य उब घेऊन आलेला असतो. अशा या भारलेल्या वातावरणाला कशिश ‘पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम् कौलारावर थेंब टपोरे तडम् तडतड तडम्’ हे बडबड गीत सादर करुन शिक्षण मंत्र्यांनाही तिसरीच्या भाव विश्वात घेऊन जाते. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे मुलींच्या गुणवत्तेचे कौतुक करुन पुढच्या शाळा भेटीला रवाना होतात.
कळमेश्वर येथील नगर परिषदेची शाळा, नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत कळमना संजयनगर येथील हिंदी उच्च प्राथमिक शाळा याठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षण उपसंचालक दिपेंद्र लोखंडे व वरिष्ठ अधिकारी होते. कळमेश्वर येथील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत त्यांनी विचारणा करुन त्यावर उपचार केले जातात का याची माहिती घेतली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये चर्मरोगासारख्या आजारावर लक्ष वेधून शिक्षकांनी त्याबाबतही विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे दिले पाहिजे असे सांगितले. मुलांच्या स्वच्छतागृहाची त्यांनी पाहणी केली.