पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील भक्कम संपर्कयंत्रणा व दळणवळण निर्माण होण्यासाठी महत्त्वाचे रस्ते पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे रस्ते व पूल विकास कामांचा मार्ग केंद्रीय मार्ग निधी सन २०२०-२१ अंतर्गत समावेश व्हावा, अशी मागणी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे केली. याबाबत सकारात्मकपणे कार्यवाही करू, असे केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय परिवहन मंत्री श्री.गडकरी हे अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली. जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते व पूल कामे पूर्ण होण्यासाठी सुमारे १ हजार १३१ कोटी निधीची आवश्यकता आहे. केंद्राकडून हा निधी मिळवून द्यावा, अशी विनंती पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
जिल्ह्यातील पूर्णानगर निरुळ गंगामाई वाठोडा (शु) खोलापूर रस्त्यावरील मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी पाच कोटी रूपये निधीची आवश्यकता आहे. हा राज्यमार्ग दर्जाचा रस्ता असल्याने पावसाळ्यात वाहतूक खंडित होते. तसेच, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, भातकुली व तिवसा तालुक्यातून जाणारा अंजनगाव काकडा रासेगाव येवता साऊर शिराळा यावली डवरगाव कापूसतळणी मोझरी वऱ्हा कुऱ्हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा आहे. तो पूर्ण करण्यासाठी ५०३ कोटी ४० लाख रूपये निधीची गरज आहे.
अचलपूर, चिखलदरा व धारणीतून जाणाऱ्या बामणी चंद्रपूर यवतमाळ बडनेरा अमरावती परतवाडा हरिसाल धारणी बऱ्हाणपूर रस्ता हा दोन राज्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. त्यासाठी ५४२ कोटी ४० लक्ष निधी अपेक्षित आहे. अमरावती मनपा क्षेत्रातील इर्विन चौक ते बियाणी चौक हा अडीच कि.मी. लांबीचा वर्दळीचा महत्त्वाचा मार्ग असून, १२ कोटी खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे, अमरावती शहरातील पंचवटी चौक- गर्ल्स हायस्कूल ते मालटेकडी या दोन कि.मी. लांबीच्या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी निधी लागणार आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर ब्राम्हणवाडा (गोविंदपूर) रा.मा. ४० हा प्रमुख मार्ग दर्जा असलेला रस्ता असून अपूर्ण लांबीसह रस्ता पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ४० कोटी निधी अपेक्षित आहे. मार्की निरूळ गंगामाई महिमापूर-प्रजिमा ७० वरील निरूळ गंगामाई गावाजवळ पूर्णा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी २० कोटी निधीची गरज आहे. या सर्व कामांचा केंद्रीय मार्ग निधी २०२०-२१ अंतर्गत करण्यात यावा, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केंद्रीय परिवहन मंत्री श्री. गडकरी यांना केली. या मागण्यांचे लेखी निवेदन केंद्रीय वाहतूक मंत्र्यांना देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी श्रीमती ठाकूर यांनी केली.
केंद्राकडून हा निधी प्राप्त झाल्यास हे सर्व महत्त्वाचे रस्ते व पुलाची कामे पूर्ण होऊन विकासाला गती मिळेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.