क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने हरहुन्नरी समीक्षकाला मुकलो-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

प्रख्यात क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना क्रीडा मंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई,दि.६:- प्रख्यात क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. क्रिकेटवर लिहिणे, बोलणे आणि मराठी साहित्यातली रुची यामुळे त्यांनी क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या निधनाने हरहुन्नरी समीक्षकाला मुकलो असल्याची शोकभावना क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात क्रीडा मंत्री श्री. भरणे म्हणतात की, मराठमोळे समीक्षक म्हणून द्वारकानाथ संझगिरी यांची ओळख होती. क्रिकेटचा सामना आपल्या लेखणीतून समोर उभा करण्याचे त्यांचे कोशल्य अतुलनीय होते. म्हणूनच क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्या लेखणीला कायमच दाद दिली. क्रिकेटची माहिती देणारा, त्यातली सौंदर्यस्थळं आपल्या लेखणीने अचूक मांडणारा लोकप्रिय असा अवलिया समीक्षक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने हरहुन्नरी लेखणी शांत झाली आहे. त्यांचे लोकप्रिय व्यक्तिमत्व, त्यांचे लेखन क्रिकेट रसिकांच्या नेहमीच स्मरणात राहील. मी या प्रख्यात मराठमोळ्या समीक्षकाला श्रद्धांजली वाहतो. संझगिरी कुटुंबियांवर, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखात आम्ही सहभागी आहोत.अशा शब्दात क्रीडा मंत्री श्री. भरणे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.
0000000