पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण

पुणे, दि.६: महाराष्ट्र राज्याचे तंत्रज्ञान व मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे. उद्योग वाढीच्यादृष्टीने जागतिक पातळीवर संवाद साधण्यात येत असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण निर्मिती करीता पोलीस दलाने काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

चिखली येथील पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित गोरखे, विजय शिवतारे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शरद सोनवणे, शंकर जगताप, बाबाजी काळे, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएमपीएल व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर  आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईनंतर पुणे शहराचे पोलीस आयुक्तालय मोठे होते. पुणे शहराचा विस्तार तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झालेले नागरीकरण तसेच पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या प्रमाणातील औद्योगिकीकरण आणि परिसरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवणे याबाबींचा विचार करुन सन २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. यावर्षी नवीन पोलीस आयुक्तालय स्वतःच्या इमारतीत जाणार असून त्याचे आज भूमिपूजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, शासकीय इमारती चांगल्या झाल्या पाहिजेत असा राज्य सरकारचा आग्रह आहे. यादृष्टीने देशातील सर्वात आधुनिक पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारतही होत आहे. याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर इमारत या ठिकाणी होत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता अत्यंत चांगली निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. या इमारती बघितल्यानंतर एखाद्या खासगी विकासकाला मागे टाकतील, अशा आहेत.

उद्योगधंद्याला राज्यात त्रास होता कामा नये

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून म्हाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल बांधण्यात आले आहे. याचा मनस्वी आनंद आहे, असे सांगून ते म्हणाले, उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी राज्य शासन प्रयत्न करत असताना उद्योगधंद्याला राज्यात त्रास होता कामा नये. उद्योजकांकडून प्राप्त तक्रारीची दखल घेऊन कडक कारवाई करावी. गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्याकरिता मकोका सारखी कारवाई केली पाहिजे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने विविध लोकाभिमुख प्रकल्पावर भर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने मध्यवर्ती अग्निशामक केंद्र आणि अग्निशामक प्रबोधिनी इमारतीचे काम हाती घेतले आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. शहराच्या हद्दीत याकरीता आरक्षित जागेचा पुरेपूर वापर केला पाहिजे.  कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करुन अनधिकृत जाहिरात फलकावर नियंत्रण ठेवण्याकरीता एक चांगली यंत्रणा तयार केली आहे, नागरिकांनी अधिकृत जागेवरच जाहिरात फलके लावली पाहिजे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात विविध चांगले प्रकल्प हाती घेतले असून नागरिकांना याचा लाभ होणार आहे. प्रशासनात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणून नागरिकांना उत्तरदायी प्रशासन सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन (सीएचडीसी) च्या माध्यमातून निर्माण होण्यास मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे असलेल्या जागेबाबत महानगरपालिकेसोबत बैठक लावून जागेबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्या जागेवर आधुनिक शहराला पूरक अशा बाबी करण्यात येईल.

पुरंदर विमानतळ हे पुण्याचा विकासाला चार पटीने पुढे नेणार

पुरंदर विमानतळ हे पुण्याचा विकासाला चार पटीने पुढे नेणार आहे. येथे केवळ विमानतळ नसून लॉजिस्टिक पार्क तयार करण्यात येईल. पुण्याच्या औद्योगिकरणासाठी ‘इको सिस्टीम’ तयार होईल, तरुणांना रोजगार मिळेल. त्यामुळे जोपर्यंत आपण नवीन विमानतळ बांधणार नाही तोपर्यंत  पुणे शहराला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ख्याती मिळणार नाही.  विमानतळासाठी भूसंपादन करताना कोणाचेही नुकसान होणार नाही. याकरीता चांगले दर ठरवून दर देण्यात येतील, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

आगामी ५० वर्षाचा विचार करुन अद्ययावत इमारती उभारण्यावर भर -उपमुख्यमंत्री अजित पवार

श्री. पवार म्हणाले,  या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ७३० कोटी रुपयांचे विविध विकासकामे होणार आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ४७५ कोटी आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाचे १८० कोटी रुपये आणि पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीचे ६२ कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येत आहे. ही कामे दर्जेदार, आकर्षक व्हावीत याकरिता संकल्पना स्पर्धा घेण्यात येतात, यामधून उत्तम आराखड्याची निवड करण्यात येते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीत वाढ होण्यासोबतच त्या इमारतीत नागरिकांना समाधान वाटले पाहिजे, यादृष्टीने आगामी ५० वर्षाचा विचार करुन अद्ययावत, इको फ्रेडली इमारतीचे कामे करण्यात येत आहे.

शहरात विविध शासकीय इमारतीचे बांधकाम सुरु

पुणे शहरात ८७ कोटी रुपये खर्च करुन सारथीची इमारत पूर्ण करण्यात आली आहे. शिक्षण, कृषी, नोंदणी, कामगार, सहकार आणि पणन भवन, जमाबंदी आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, सामाजिक आयुक्तालय, सारथी प्रादेशिक कार्यालय, येरवडा येथे न्यायालय, मनोरुग्णालय, नवीन मध्यवर्ती इमारत, बालेवाडी येथे ऑलम्पिक भवन तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका इमारत, न्यायालय, आदी इमारतीचे काम करण्यात येत  आहे. इमारतीचे कामे करताना जागेचा पुरेपूर वापर करुन जागा सपाटीकरण करुन वाहनतळ, स्वच्छ सूर्यप्रकाश, सौर ऊर्जा आदी सुविधा विचारात घेऊन दर्जेदार, टिकाऊ, हरित इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात लोकसंख्या वाढ होत आहेत, नागरिकांना पायाभूत सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, यादृष्टीने काम करण्यात येत आहे.

कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी

पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरीता पोलीस दलाला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवावी. कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यावर कठोर कारवाई करुन गुन्हेगाराला शिक्षा केली पाहिजे, नागरिकांनी कायद्याचे पालन करावे. ताथवडे येथे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाला २० हेक्टर जागा पुरेशी असून उर्वरित जवळपास  ४५ हेक्टर जागा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नागरी सुविधांकरीता द्यावी, अशी मागणी देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

विकासाला गती देण्याकरीता पुरंदर विमानतळ आवश्यक

विमानतळामुळे जिल्ह्याच्या विकासाला मर्यादा येत असून विकासाला गती देण्याकरिता पुरंदर विमानतळ करणे आवश्यक आहे. याकरीता भूसंपादनामध्ये जाणाऱ्या जमिनीला राज्यसरकारच्यावतीने योग्य तो मोबदला देण्यात येईल, याकामी नागरिकांनी सहकार्य करावे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते, पूल बांधण्यासोबतच रिंगरोड, मेट्रो, पीएमपीएमपीएल सेवा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक विकास कामे करताना अतिक्रमणे काढण्यात यावी, असेही श्री. पवार म्हणाले.

आमदार श्री. लांडगे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयाच्या माध्यमातून गुन्हेगारी नियंत्रण, विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यात आलेले आहे. शहराचे नावलौकिक वाढविण्यासोबतच वैभवात भर पाडणारी इमारत उभी राहणार आहे. आगामी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतील, अशी अपेक्षा श्री. लांडगे व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड शहरात विविध विकास कामे आणि प्रकल्पांचे ई-भूमिपूजन व लोकार्पण

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड, म्हाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल व पोलीस विश्रामगृह देहुरोड, पुणे पोलीस अधीक्षक या इमारतींचा भूमीपूजन तसेच प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय मधील शिवनेरी सभागृहाचे उद्घाटन  करण्यात आले. पिंपरी येथील भूखंडावरील मध्यवर्ती अग्निशामक केंद्र आणि अग्निशामक प्रबोधिनी इमारत,  आकुर्डी प्राधिकरण येथील हेडगेवार भवनजवळील अग्निशमन केंद्र, पवना नदीवरील मामुर्डी ते सांगवडे दरम्यान जोडणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमीपूजन तसेच मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड, २४ मी. डी.पी रस्ता, सिल्व्हर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड १८ मीटर डी.पी रस्ता तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

स्मार्ट सिटीच्या वतीने जीआयएस आधारित ईआरपीअंतर्गत कोअर ॲप्लिकेशन (सॅप). नॉन कोअर ॲप्लिकेशन, ई-ऑफिस (डीएमएस) आणि भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये विकसित केलेल्या संगणक प्रणाली, तालेरा रुग्णालय नवीन इमारत, शहरातील विविध ठिकाणी ‘वेस्ट टू वंडर’टाकाऊ वस्तूंपासून निर्मित केलेल्या टिकाऊ कलाकृती, महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतीवर बसविण्यात आलेल्या रुफ टॉप सोलर प्रणालीचे लोकार्पण तसेच सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन उपक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे स्वयंचलित होर्डिंग शोध व सर्वेक्षण प्रणाली उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मुलांना गुन्हेगारी वृत्तीपासून दूर ठेवण्यासाठी दिशा उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आले. सायबर गुन्हेगाराचा तपास करणाऱ्या तसेच दहशतवाद विरोधी पथकातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

श्री. सिंह यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत करण्यात येणारी विविध विकासकामे आणि प्रकल्पाबाबत माहिती दिली. तर श्री. चोबे आणि श्री.देशमुख यांनी नवीन इमारतीबाबत प्रास्तविकात माहिती दिली.  उपस्थित मान्यवरांचे आभार अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मानले.

000