नागपूर विभागात ग्रामीण भागातील घरकुलांचे उद्दिष्ट गतीने पूर्ण करा – मंत्री जयकुमार गोरे

नागपूर विभागाचा आढावा

  • विभागाला देण्यात आलेले १०० दिवसांचे उद्दिष्ट विना तडजोड पूर्ण करा

नागपूर, दि. ०६ : विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून द्या, या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी शासनास कळवून सोडवून घ्या, नियोजन करा व ग्रामीण भागातील घरकुलांचे उद्दिष्ट गतीने पूर्ण करा, अशा सूचना आज ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण विकास विभागाला दिलेले 100 दिवसांचे उद्दिष्ट विना तडजोड पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, विभागातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री विनायक महामुनी (नागपूर),समीर कुर्तकोटी (भंडारा), मुरुगानंथम एम. (गोंदिया), विवेक जॉनसन (चंद्रपूर), जितीन रहमान (वर्धा), सुहास गाडे (गडचिरोली) यांच्या सह विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विकास आस्थापना शाखेचे उपायुक्त विवेक इलमे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. गोरे यांनी प्रधानमंत्री आवास योजनासह (ग्रामीण-टप्पा 1 व 2) राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व मोदी आवास योजनांमध्ये विभागातील उद्दिष्ट, पूर्ण झालेली कामे व अडचणीच्या कामांची माहिती घेतली. मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय असलेली मजुरी लाभार्थ्यांना कटाक्षाने देण्याबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच भूमिहीन लाभार्थ्यांना विविध मार्गांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध काम करा व तांत्रिक अडचणी  शासनाकडून सोडवून घेण्याच्या व लाभार्थ्यांना वेळेत लाभाचे हप्ते देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बचतगटांच्या माध्यमातून महिलांना उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देत त्यांना लखपतीदीदी बनविण्याचे राज्याने ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने गतीने कामे करा, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये गुणात्मक शिक्षण देत येथील परिसर स्वच्छ व नेटका ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यात उमेद मॉल उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगत वर्षभरात 15 मॉल उभारण्यात येईल व दोन वर्षात सर्व जिल्ह्यांमध्ये मॉल उभारण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री यांनी विविध विभागांना 100 दिवसांचे उद्दिष्ट दिले असून ग्रामविकास व पंचायतराज विभागाला देण्यात आलेले उद्दिष्ट कुठलीही तडजोड न करता पूर्ण करा. या कालावधीत जास्तीत-जास्त प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास विभागाच्या योजना व आस्थापना शाखांद्वारे  विभागातील कामकाजाबाबत सादरीकरण करण्यात आले व जिल्हा परिषदेकडील विविध योजना, अभियाने, प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. विभागातील अपील प्रकरणे तसेच 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्हा परिषदांकडून सादरीकरण करण्यात आले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांचाही आढावा घेण्यात आला.

बैठकीपूर्वी, नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वनहक्क पट्टयांचे प्रातिनिधिक 10 लाभार्थ्यांना यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिनेश मासोदकर यांनी तर विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी आभार मानले.

०००