मुंबई, दि.०७ : भारत व इटली देशांमधील राजकीय संबंध अतिशय दृढ असून उभय देशांमध्ये विद्यापीठ स्तरावर शैक्षणिक तसेच संशोधन सहकार्य वाढविणे, तसेच सांस्कृतिक संबंध, पर्यटन व इटालियन भाषा शिक्षणाला भारतात चालना देण्यास इटली उत्सुक असल्याचे इटलीचे भारतातील राजदूत अँटोनियो एन्रिको बार्टोली यांनी आज येथे सांगितले.
राजदूत अँटोनियो बार्टोली यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
भारत व इटलीचे पंतप्रधान यांच्यामध्ये राजकीय स्तरावर घनिष्ट संबंध असून आज भारत आणि इटलीमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान, दळणवळण, नाविन्यता व स्टार्टअप, अवकाश विज्ञान व संरक्षण, सुरक्षा व सायबर सुरक्षा, पर्यटन व सिनेमा आदी क्षेत्रात सहकार्य सुरु आहे असे राजदूतांनी सांगितले.
इटलीचे उपपंतप्रधान तथा संरक्षण मंत्री एका मोठ्या उद्योग व्यापार शिष्टमंडळासह एप्रिल महिन्यात भारत भेटीवर येत असून महाराष्ट्रातील मोठ्या कंपन्या, उद्योग व स्टार्टअप, स्मार्ट कृषीविज्ञान, हरित तंत्रज्ञान व जैवइंधन तसेच घनकचऱ्यावर प्रक्रिया आदी क्षेत्रात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इटलीमध्ये 85 टक्के कचऱ्याचे पुनर्चक्रण होत असल्याचे सांगताना या क्षेत्रात इटली भारताला सहकार्य करू शकेल असे त्यांनी सांगितले. उभय देशांमधील स्टार्टअपमध्ये सहकार्य वाढवण्यास आपण उत्सुक असून यासंदर्भात आयआयटी मुंबईशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजदूतांचे स्वागत करताना राज्यपालांनी उभय देशांना वस्त्रोद्योग क्षेत्रात देखील सहकार्य करण्यास वाव असल्याचे सांगितले. व्यापार संबंध वाढविण्यासाठी आपण राज्याच्या उद्योग मंत्र्यांशी चर्चा करू तसेच राजभवन येथे उद्योजक व चेंबर ऑफ कॉमर्स सदस्यांना बोलावून चर्चा करू असे राज्यपालांनी सांगितले. राज्यातील विद्यापीठांमध्ये इटली भाषेचे केंद्र सुरु करण्याबद्दल देखील आपण सूचना करू असे राज्यपालांनी सांगितले. नवी मुंबई विमानतळ कार्यरत झाल्यानंतर मुंबईतून इटलीतील शहरांशी थेट विमान वाहतूक सुरु करण्याबद्दल आपण व्यक्तिशः लक्ष घालू असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी इटलीचे मुंबईतील वाणिज्यदूत वॉल्टर फेरारा व उपवाणिज्यदूत लुइगी कॅस्कोन उपस्थित होते.
०००