छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्याचा वस्तुपाठ घालून दिला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उद्घाटन
  • विदर्भातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन

नागपूर, दि. ०७ : जलव्यवस्थापन, पर्यावरण रक्षण, कायदा व सुव्यवस्था, महिलांचे संरक्षण, सर्व जातीधर्माचा सन्मान असा आदर्श वस्तुपाठ छत्रपती  शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून दिला आहे.  हा समृद्ध वारसा जपण्यासह तो नव्या पिढीपर्यंत प्रवाहित होण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार,  मुख्य सचिव सुजाता सौनिक,  मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे,  मनपा आयुक्त डॅा. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, पोस्ट मास्टर जनरल (नागपूर परिक्षेत्र) शोभा मधाळे,  मुधोजीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी ज्या वाघनखाचा वापर केला होता ती वाघनखे मोठ्या प्रयत्नानंतर आपण आणली आहेत. सुरुवातीला साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये ही वाघनखे ठेवण्यात आली. महाराष्ट्राला मिळालेल्या या शौर्याच्या वारशाची अनुभूती पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी घेतली. ही अनुभूती घेण्याची संधी विदर्भातील युवकांना, जनतेला मिळाली असून याचा अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी संबधित विभागाने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महाराष्ट्रावर ज्यावेळी आक्रमणे झाली त्याकाळी आपले संस्कार, आपली संस्कृती, स्वभाषा, स्वधर्म हा जिवंत राहील की नाही अशा प्रकारची अवस्था होती. मात्र शिवरायांनी हे स्वातंत्र्य अबाधित ठेवले. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्या स्वातंत्र्याची पायाभरणी छत्रपती शिवरायांनी केली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, राज्याचा गौरवशाली इतिहास सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यावर सांस्कृतिक कार्य विभागाचा भर आहे. त्यातीलच वाघनखांचे प्रदर्शन हा एक भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘विरासत से विकास’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

या कार्यक्रमात शिवकालीन शस्त्रे या माहिती पुस्तिकेचे तसेच वाघनखावर आधारित विशेष टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद ओक यांनी सूत्रसंचालन केले तर पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी आभार मानले.

मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे शानदार उद्घाटन

मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार,  मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे,  मनपा आयुक्त डॅा. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, मुधोजीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार होण्याची नागपूरकरांना ही अपूर्व संधी मिळाली आहे. वाघनखे ही महाराष्ट्राच्या शौर्याचा मनबिंदू आहे. स्वराजाच्या रक्षणासाठी वाघनखांचा चपखल वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. माजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी प्रयत्नपूर्वक ही वाघनखे महाराष्ट्रात आणली आहेत. महाराष्ट्रातील हजारो युवक या शिवशस्त्र शौर्य प्रदर्शनातून प्रेरणा घेतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. मराठाकालीन शस्त्रास्त्रे, वाघनखे याची त्यांनी पाहणी केली. या ठिकाणी साहसी मर्दानीखेळ, चर्चासत्र,  व्याख्याने यानिमित्ताने आयोजित केले जातील असे त्यांनी सांगितले.

०००