मोघरपाडा कारशेड जागेसंदर्भात आगरी-कोळी बांधवाच्या विकासाच्या दृष्टीने कुणावरही अन्याय होणार नाही – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे,दि.22(जिमाका):- मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज शेतकऱ्यांसोबत जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकारात्मक चर्चा संपन्न झाली.

या बैठकीत जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीए चे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुद्गल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा भूमी अधीक्षक बाबासाहेब रेडकर, तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी तसेच प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित बाधित शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना शासनाने या संदर्भात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मौजे मोघरपाडा, सर्व्हे नं.30 मधील 167 भाडेपट्टेधारक शेतकरी व 31 अतिक्रमणधारक शेतकरी यांना विशेष नुकसान भरपाई योजना म्हणून शासनाने धोरण तयार केले असून शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारची सुयोग्य भरपाईची योजना राबविली आहे. मौजे मोघरपाडा, सर्व्हे नं.30 येथील 174.01 हे.आर. जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जमिनीवरील पट्टेधारक शेतकरी तसेच अतिक्रमण धारकांची पात्रता जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केली आहे. विकसित भूखंडासाठी सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय आहे

ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही परंतु कब्जा आहे. ही जमीन शासनाची असेल तर नवी मुंबई क्षेत्रात देणात येणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क संदर्भात राज्यात जो मोबदला धोरण राबविले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 7/12 आहे, त्यांना 22.5 टक्के मोबदला शासनाच्या नियमानुसार देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांचे नाव नाही परंतु अतिक्रमण कब्जा आहे व ती जमीन शासनाची आहे, त्या ठिकाणी 12.5 टक्के शासनाच्या नियमानुसार मोबदला देण्यात येईल.  त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना योग्य तो  मोबदला निश्चित देण्यात येणार आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचे हे राज्यातील पहिलेच उदाहरण आहे. त्यासंदर्भात त्यांना कशा प्रकारचा मोबदला म्हणजे वस्तूनिहाय प्लॉट, तेथील रस्ते, गटारे, भूखंड, इलेक्ट्रॉनिक पोल, शेतकऱ्यांस कसा फायदा होईल व पुनर्वसन कसे होईल, याविषयी देखील त्यांनी सांगितले.

यावेळी एमएमआरडीएचे विकास पाटील यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे या शेतकऱ्यांना शासनाकडून कोणते लाभ देण्यात येणार आहेत, याविषयी सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. तसेच जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव व एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुद्गल यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले की, सर्व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला नक्की दिला जाईल. शासनाच्या प्रकल्पासाठी शेतकरी करीत असलेल्या सहकार्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदनही केले, त्यांचे आभार मानले.
0000