महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्यासाठी जागतिक बँका सकारात्मक

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, कोरियन एक्झिम व एएफडी बँक यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक

नागपूर,दि.०७ : महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नारपार सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमणगंगा-एकदारे-गोदावरी योजनेला वित्तीयसहाय मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक, कोरियन एक्झिम बँक व एएफडी यांच्यासमवेत चर्चा केली. या प्रकल्पांच्या वित्तीय सहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीयसंस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या बैठकीत नारपार सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमणगंगा-एकदारे-गोदावरी योजना याबाबत सादरीकरण करण्यात आले. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष हुन किम यांनी या प्रकल्पाबाबत आम्ही सर्वतोपरी सहाय्य करु, असे सांगितले.

या बैठकीस कोरियन एक्झिम बँकेचे वरिष्ठ अधिकारी जंग वॅन रीव्यू, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस.आर. तिरमनवार, तापी सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी संचालक जे.डी.बोरकर, कोरियन एक्झिम बँकेचे प्रकल्प विकास तज्ज्ञ रागेश्री बोस व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तापी रिचार्ज योजनाबाबत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून त्यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविल्याची माहिती सिंचन विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी दिली. दूरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी बैठकीत सहभाग घेतला.

000