नागरिकांना अधिकाधिक सेवा ऑनलाईन द्या – पालक सचिव असिम गुप्ता

शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत विविध विभागांचा घेतला आढावा

नागपूर, दि.08 : विविध विभागांसाठी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या कृती कार्यक्रमाची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यासाठी शासनाच्या सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवित यातील अधिकाधिक सेवा या विहित कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन करण्याचे निर्देश नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव असिम गुप्ता यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॅा. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अजय चारठाणकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

100 दिवस कृती आराखड्यानुसार संकेतस्थळांचे अद्ययावतीकरण नागरिकस्नेही करणे, गुंतवणुकीस प्रोत्साहन, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निराकरण करणे आवश्यक आहे. अधिका-यांनी कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्याची गरज आहे. शासनाच्या मैत्री पोर्टलवर नागपूर जिल्ह्याचे उद्योग विभागाचे प्रलंबित प्रस्ताव, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे केंद्रीकृत पोर्टल, माहितीच्या अधिकारांतर्गत देण्यात येणा-या सर्व विभागांच्या सेवा संकेतस्थळावर टाकणे, कार्यालये विशेषतः प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ, स्वच्छता व अभिलेख, ई नझुल अर्ज, पाणंद रस्ते मोजणी, दाखल्यांसाठी विशेष शिबिरे, पारधी समाजातील बांधवांना गृहचौकशीच्या आधारावर जातीच्या दाखल्यांचे वितरण, फेरफार निर्गती, क्षेत्र भेटी या विषयांची माहिती देत सादरीकरण केले.

मनपा आयुक्त डॅा. अभिजित चौधरी यांनी शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेने केलेल्या कार्यवाहीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यात महानगरपालिकेचे संकेतस्थळ, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोईसुविधा या विषयांचे सादरीकरण केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी जिल्हा परिषदेतील विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली तसेच शंभर दिवसाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने माहिती दिली. यात ग्रामीण भागातील घर कर आणि पाणी कर वसुली शिबिरांचे आयोजन, दवाखाना आपल्या दारी अंतर्गत पारधी समाजासाठी आरोग्य तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी शिबिरे, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या विषयांच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.