योग्य नियोजनासह सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

१० वी, १२ वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई, दि. १०: जीवनात स्वतःशी स्पर्धा ठेवून प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा. आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा, उद्दिष्टांचे लहान लहान टप्पे करुन ते पूर्ण केल्याचा क्षण साजरा करा. तसेच परीक्षांचा ताण न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, त्यातून नक्की यश मिळेल, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्ली येथे शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या मुंबईत शिवाजी पार्क येथील स्काऊट आणि गाईडच्या सभागृहात झालेल्या प्रसारण कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह विविध शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा हेच अंतिम ध्येय न ठेवता सर्वांगीण ज्ञान मिळविण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला ओळखून वर्तमानातील प्रत्येक क्षण उत्तम पद्धतीने जगावा. लिहिण्याच्या सवयीतून आपले मत व्यक्त होत असते.

अपयश हे जीवनात यशस्वी होण्यासाठीचे इंधन असते, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना अपयशाची भीती न बाळगता त्याला आपला गुरू बनविण्याचा सल्ला दिला. एकाग्रतेसाठी ध्यान धारणेला महत्त्व असल्याचे सांगून निसर्ग, संतूलित आहार, नवनवीन तंत्रज्ञान, नेतृत्व करताना टीम वर्क आदी बाबींचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी निसर्गाची काळजी घेण्याचे आवाहन करून त्यांनी विद्यार्थ्यांना ‘एक पेड मा के नाम’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. पालकांनी विद्यार्थ्यांमधील क्षमता, त्यांच्या इच्छा ओळखावी आणि त्यांना प्रोत्साहन देऊन मदत करावी, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.

यशासाठी मनातील भीतीवर विजय मिळवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आव्हाने ही सर्वांसमोर असतात. सकारात्मकतेने त्यावर मात करावी, विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातील भीतीवर विजय मिळवावा. सरावाने सामान्य माणूस देखील असामान्य काम करून असामान्य बनू शकतो, यामुळे प्रधानमंत्री यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्वतःला ओळखून स्वतःमधील क्षमता वाढविण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केवळ परीक्षा हेच अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातील आव्हानांशी कसा सामना करावा यादृष्टीने प्रधानमंत्र्यांशी झालेला संवाद हा अतिशय उपयुक्त आहे. प्रधानमंत्री अतिशय संघर्षमय जीवनातून यशस्वी झाले असून त्यांनी जगात भारताची नवी ओळख तयार केली आहे. या अनुभवातून विद्यार्थ्यांना जीवनाचे ज्ञान मिळावे, हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एसएनडीटी महाविद्यालयाच्या डॉ. अदिती सावंत यांच्या कॉटन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

०००

बी.सी. झंवर/विसंअ/