मुंबई, दि. १० : ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येते. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ होण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बोंदरे, वित्तीय सल्लागार प्रमोद पेटकर, महाव्यवस्थापक (प्रशासन) सुनील सोवितकर, महा व्यवस्थापक (ऑपरेशन) रामेश्वर कुंभार उपस्थित होते.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, मोफत आरोग्य सुविधेपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. यासाठी प्रभावी जनजागृती, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, आणि ग्रामसेवक यांच्या मदतीने घरगुती सर्वेक्षण व लाभार्थी सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिल्या.
प्रधाननमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना होण्यासाठी व तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढवण्यात यावी, असेही राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.
राज्यमंत्री बोर्डीकर यांनी यावेळी आरोग्य सुविधा, मनुष्यबळ आदीबाबींचा आढावा घेतला.
०००
मोहिनी राणे/ससं/