‘दिलखुलास’ मध्ये परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुलाखत

मुंबई दि. १०: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेले ‘रस्ता सुरक्षा अभियान’ व विविध उपक्रम’ याविषयावर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 12, गुरुवार दि. 13, शुक्रवार दि.14 आणि शनिवार दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका रितली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

रस्ता सुरक्षा ही आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व रस्ते अपघातांचे टाळण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता परिवहन विभागामार्फत दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून स्पीड गन, हेल्मेटचा वापर करणे, विभागामार्फत लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. तसेच नुकताच सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे, जुन्या गाड्या वापराबाबत करावयाच्या नियमांचे पालन आदी निर्णय आणि शंभर दिवसाच्या कामकाजात प्रामुख्याने करावयाच्या बाबी, याविषयी परिवहन आयुक्त भीमनवार यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/