दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

नांदेड, दि. १० : दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा अभियान’ राबविण्याचे निश्चित केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने, नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्या दिनांक ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत यानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पालकमंत्री श्री.सावे म्हणाले, “शिक्षण हे केवळ गुणांसाठी नाही, तर ते ज्ञानवृद्धी आणि जीवनमूल्य घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून, प्रामाणिक प्रयत्नांद्वारे यश संपादन करावे. आगामी परीक्षा काळात जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि सर्व परीक्षा केंद्रे कॉपीमुक्त आणि भयमुक्त राहतील यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापनांनाही अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

0000