जपानची कार्यसंस्कृती जगात सर्वोत्तम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जपानचे सम्राट नारुहितो यांच्या वाढदिनानिमित्त जपानच्या वाणिज्य दूतावासातर्फे स्वागत समारंभ

मुंबई, दि. ११:  जपानचे लोक परिश्रमी, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असून जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम आहे. हिरोशिमा व नागासाकी शहरे बेचिराख झाल्यानंतर ज्या निर्धाराने जपान नव्या उमेदीने उभा ठाकला, ते अतिशय कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी  काढले.

जपानचे सम्राट नारुहितो यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासातर्फे सोमवारी (दि.१०) हॉटेल ताजमहाल, मुंबई येथे एका स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कारचा शोध अमेरिकेत लागला असला तरी जपानमध्ये तयार झालेल्या कार गुणवत्तेच्या बाबतीत जगात सर्वोत्कृष्ट व आरामदायी असतात. जपानमध्ये निर्माण झालेले प्रत्येक उत्पादन गुणवत्तेच्या कसोटीवर पूर्णपणे खरे उतरल्याशिवाय जपान ती वस्तू बाजारात आणत नाही, ही गोष्ट शिकण्यासारखी आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प, विशेषतः अटल सेतू , मुंबई मेट्रो लाईन, बुलेट ट्रेन यांना अर्थसहाय्य करीत असल्याबद्दल राज्यपालांनी जपान सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

भारत आणि जपानमध्ये अनेक शतकांपासून सांस्कृतिक, अध्यात्मिक व तत्वज्ञान विषयक संबंध दृढ असून उभय देशांमध्ये पर्यटन विशेषतः अध्यात्मिक पर्यटन तसेच वैद्यकीय पर्यटन पर्यटनाला चालना देणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

भारत आणि जपानमधील संबंध स्वाभाविक आणि राजनीतिक दृष्टीने महत्त्वाचे असून आज उभय देशांमध्ये आर्थिक, व्यापार विषयक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य नव्या उंचीवर गेले आहे. महाराष्ट्राने पायाभूत सुविधा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून जपानतर्फे दिल्या जाणाऱ्या मदतीचा सर्वात मोठा लाभार्थी महाराष्ट्र असल्याचे जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांनी यावेळी सांगितले.भारतातून गेल्यावर्षी २.३० लाख पर्यटक जपानला गेले असून ही पर्यटक संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात भारत व जपानच्या राष्ट्रगीताने करण्यात आले. जपानचे सम्राट नारुहितो यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे, या शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईतील जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योगक्षेत्रातील प्रमुख व्यक्ती तसेच विविध देशांचे वाणिज्यदूत उपस्थित होते.

०००