‘प्रोजेक्ट सक्षम’ अंतर्गत गरजू महिलांना उद्योगपूरक उपक्रमांचे उद्या वाटप

मुंबई, दि. ११ : युनायटेड वे मुंबई या सामाजिक संस्थेच्या ‘प्रोजेक्ट सक्षम’ या मुख्य उपक्रमाअंतर्गत महिलांना व्यावसायिक कौशल्ये व उद्योजकीय संधी उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात येते. या उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गरजू महिलांना उद्योगपूरक संसाधनांचे वाटप करण्यात येणार आहे.

बँक ऑफ बडोदाच्या औद्योगिक सामाजिक बांधिलकी अंतर्गत युनायटेड वे मुंबई सोबत करार करण्यात आला आहे. या अंतर्गत १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता वालचंद हिराचंद हॉल, चर्चगेट येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बॉबकार्डचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र राय यांनी दिली आहे.

सामाजिक समस्यांवर काम करताना आर्थिक दुर्बल घटकांना सशक्त करण्यासाठी हे उपक्रम राबविण्यात येतात. प्रोजेक्ट सक्षम हा उपक्रम महिलांना व्यावहारिक कौशल्ये, व्यवसाय प्रशिक्षण आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्यावर लक्ष केंद्रीत करतो. शिक्षण, आरोग्य, उत्पन्ननिर्मिती, पर्यावरणीय शाश्वतता आणि सार्वजनिक सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांत हे कार्यरत आहेत.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/