वाघांची शिकार रोखण्यासाठी विशेष पथके गठीत करा- वनमंत्री गणेश नाईक

मुंबई दि. ११ : वाघांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबरोबरच शिकार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाटप्रमाणे इतर ठिकाणीही विशेष पथके गठीत करण्यात यावीत. अशी पथके गठीत करण्यासाठीचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या.

वनमंत्री नाईक यांच्या मंत्रालयातील समिती सभागृहात व्याघ्र शिकार प्रतिबंध संदर्भात बैठक झाली. बैठकीस मुख्य वन्यजीव संरक्षक विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वन संरक्षक एम. एस. राव, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.

वनमंत्री नाईक म्हणाले, अवैधरित्या वाघांची शिकार करणाऱ्यांवर कायद्याचा चाप बसला पाहिजे. अशी शिकार करणाऱ्या टोळ्यांची साखळी उध्वस्त होणे आवश्यक आहे. यासाठी गस्त वाढवणे, वाघांच्या भ्रमंती मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, खबऱ्यांचे जाळे विकसित करणे, संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि यासाठी असलेली साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून घ्यावी. वाघांची शिकार रोखण्यासाठी स्थानिक लोक महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. स्थानिकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. गस्त वाढवण्यात यावीत. यामध्ये अन्य विभागांचे सहकार्य घेण्यात यावे.

वाघ शिकार प्रकरणात अटक केलेल्यांची सखोल चौकशी करावी. तपासणी करण्यासाठी अन्य संबंधित विभागांची मदत घ्यावी, अशा सूचनाही वनमंत्री नाईक यांनी दिल्या.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/