मुंबई, दि. ११ : आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज, दस्तऐवज साक्षांकितीकरण, शुल्क प्रक्रिया आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे एकाच ठिकाणी सादर करता यावे, यासाठी एक खिडकी प्रणाली माध्यमातून होणारी प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक असावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एनआरआय (NRI), पीआयओ (PIO), ओसीआय (OCI) आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी ‘एक खिडकी प्रणाली’ (Single Window System) लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत या प्रणालीच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणी, तांत्रिक बाबी आणि त्यावर उपाययोजना यांबाबतही सखोल चर्चा करण्यात आली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले की, एक खिडकी प्रणालीमध्ये राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये यांचा अधिकाधिक समावेश करून घ्यावा. त्यामुळे विदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात प्रवेश घेण्यासाठी उत्तम संधी निर्माण होईल. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत सुधारणा आणि सुलभता येईल आणि महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळेल. त्यासाठी ही प्रणाली अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देशही मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.
०००
काशीबाई थोरात/विसंअ/