मुंबई, दि. ११: पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
मंत्रालयात बुलढाणा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे संचालक ई. रवींद्रन, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, मुख्य अभियंता प्रशांत भांबरे, अजय सिंह यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले की, पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील समस्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्या स्तरावर सोडवून योजनांची अंमलबजावणी तातडीने करावी. कार्यक्षम व्यवस्थापनावर भर देत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील रहावे.
यावेळी मंत्री पाटील यांनी जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजना, जल जीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्वच्छ भारत अभियान या सर्व विषयाचा सविस्तर आढावा घेतला.
पाणी पुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस रोडमॅप तयार करणे, पाणीपुरवठ्याची गुणवत्ता आणि प्रमाण तपासणे आणि कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मंत्री पाटील सांगितले.
०००
राजू धोत्रे/विसंअ/