नवी दिल्ली येथे तब्बल ७० वर्षांनंतर होऊ घातलेले ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. मराठीला अनेक वर्षांच्या मागणीनंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या संमेलनाचे महत्त्व मराठी मनाच्या दृष्टीकोनातून अधोरेखित होत आहे. या अभूतपूर्व घटनेचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहायक संचालक वर्षा फडके – आंधळे यांनी घेतलेला मागोवा…
- तब्बल ७० वर्षांनी दिल्लीत रंगणार अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा..
- माय मराठीचा जागर होणार!
- ज्येष्ठ साहित्यिक डॉ.तारा भवाळकर यांना लाभणार सहाव्या महिला संमलेनाध्यक्ष होण्याचा बहुमान!
मराठी भाषा, तिचा समृद्ध वारसा आणि साहित्य क्षेत्रातील योगदान अधोरेखित करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल ७० वर्षांनी राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे हे ९८ वे संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान पार पडणार असून साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. तारा भवाळकर भूषविणार आहेत. यापूर्वी १९५४ साली ३७ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडले आहे…
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांना मिळणार संमेलनाध्यक्ष होण्याचा मान!
१८७८ साली पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. तेव्हापासून साहित्य संमेलनाची परंपरा सुरु आहे. यंदा ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे होत आहे. १९६१ साली ग्वाल्हेर येथे झालेल्या ४३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पहिल्यांदाच एका महिलेला मिळाले होते. कुसुमावती देशपांडे या पहिल्या ज्येष्ठ मराठी लेखिकेला संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला होता. यानंतर जवळपास १५ वर्षांनी म्हणजेच १९७५ साली कराड येथे झालेल्या ५१ व्या मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमाना दिग्गज लेखिका दुर्गा भागवत यांना मिळाला होता. यानंतर जवळपास २१ वर्षांनी १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके यांनी भूषविले. तर इंदूर येथे २००१ मध्ये झालेल्या ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रतिभावान लेखिका विजया राजाध्यक्ष यांना मिळाले.
यानंतर २०१९ मध्ये म्हणजे जवळपास १८ वर्षांनी संमेलनाध्यक्षपद होण्याचा बहुमान अरुणा ढेरे यांना मिळाला. २०१९ मध्ये यवतमाळ येथे झालेल्या संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होण्याचा बहुमान डॉ. तारा भवाळकर यांना मिळाला आहे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ.तारा भवाळकर यांची तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नवी दिल्लीत होणार संमेलन
केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ३ ऑक्टोबर २०२४ रोजी दिला. मराठीसह बंगाली, आसामी, प्राकृत, पाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. अनेक वर्षांपासून मराठी साहित्यिक, भाषा अभ्यासक आदींनी ही मागणी लावून धरली होती. मराठी भाषा हा आपला अभिमान आहे. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचे योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झाले आहे. आता ७० वर्षांनंतर नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
७० वर्षांनंतर दिल्लीत होणार मराठीचा जागर !
१९५४ साली झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ तर संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर आता ७० वर्षांनी नवी दिल्लीत साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
दिल्लीतील साहित्य संमेलन –एक ऐतिहासिक क्षण!
राजधानी दिल्ली येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी अस्मिता, भाषेचा समृद्ध वारसा आणि नव्या विचारांचे संमेलन ठरणार आहे. ७० वर्षांनी दिल्लीत मराठीचा जल्लोष अनुभवण्याची ही ऐतिहासिक संधी साहित्य रसिकांना लाभणार आहे. मराठी भाषा आणि साहित्याच्या गौरवशाली परंपरेचा हा अभिमानास्पद सोहळा अनुभवणे भाषाप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
- वर्षा फडके- आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक