मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणार – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी नूतन इमारतीचे लोकार्पण

मुंबई, दि. 12 : मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामधील ‘किऑक्स’ मध्ये जगभरातील दुर्मिळ पुस्तके ऑनलाईन वाचण्याची सुविधा आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे बदलणारे अभ्यासक्रम व संदर्भग्रंथ ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयमध्ये, त्याचप्रमाणे मुंबई उपनगरातील सर्व ग्रंथालयात लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर व जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई उपनगर ‘ग्रंथोत्सव २०२४’ चे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले.

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, महानगरपालिकेच्या सर फिरोजशहा मेहता ग्रंथालय इमारतीमध्ये मुंबई उपनगरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील सोयी सुविधा देऊन या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. या परिसरातील वाचक, विद्यार्थी, ग्रंथ प्रेमींसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुंबई उपनगरचे तत्कालीन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून सर्व सोयी सुविधायुक्त ग्रंथालय उभे राहिले आहे. ग्रंथालयाच्या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्पर्धा परीक्षांची माहिती आणि पुस्तके देखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रंथालयांची मागणी विचारात घेऊन जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा. मुंबई उपनगर, मुंबई शहरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन श्री.शेलार यांनी केले.

ॲड. शेलार म्हणाले की, ग्रंथ म्हणजे प्रत्येकाचे जीवन संपन्न करणारे एक दालन आहे. प्रत्येकाला जगण्याची दिशा देणाऱ्या ग्रंथांना आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत किंवा जगभरातील प्रभावी लोक महान साहित्यिक होते.

पालकमंत्री ॲड. शेलार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. आता मराठी भाषा जगभराच्या विद्यापीठात शिकवली जाणार आहे. विविध विद्यापीठात मराठी भाषा अध्ययन केंद्र सुरू होतील. शासकीय कामकाजात देखील मराठीचा वापर बंधनकारक करण्यात आलेला आहे. नुकतीच राज्यात पहिली  हॅकेथॉन स्पर्धा जाहीर करण्यात आली असून बहुभाषिक पद्धतीने सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या स्टार्टअपना संधी उपलब्ध करून दिली आहे, त्यासाठी पारितोषिक देखील ठेवण्यात आले असल्याचे ॲड.शेलार यांनी सांगितले.

सकाळी ग्रंथदिंडीचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुंबई उपनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी संजय कुमार शिंदे, सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, प्रकाश गंगाधरे, लेखक चंद्रकांत भोंजाळ, बृहन्मुंबई महापालिकेच्या ग्रंथालय अधिकारी साधना कुदळे, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे यासह मुंबई उपनगर मधील विविध ग्रंथालयांचे अध्यक्ष, विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

विलेपार्ले येथील श्री. वा. फाटक ग्रंथालयाच्या मंजिरी वैद्य यांना  ‘ग्रंथ मित्र’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने गौरवण्यात आले. तर जिल्हा ग्रंथालयाच्या नूतन इमारतीच्या नूतनीकरणाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तुषार वटकर यांचा तर ग्रंथालयाचे कर्मचारी संपत जाधव यांची 25 वर्षे सेवा झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी केले.

दुपारच्या सत्रात ‘मराठीतील पहिले ज्ञानपीठ’ या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळ, प्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळे, प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. अनंत देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. कुमारी सई विकास खंडाळे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र’ या विषयावर व्याख्यान झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यासंदर्भात श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान पार झाले. अभिजात मराठीतील शब्द वैभव’ या विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान पार पडले. लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

ग्रंथोत्सव 2024 मध्ये 13 फेब्रुवारीला होणारे कार्यक्रम

दि. १३ फेब्रुवारी रोजी ‘कथा कवितेच्या राज्यात’ या विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण. ‘भारतीय संविधान माझा अभिमान’ या विषयावर अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे ‘लोककला समजून घेताना’ या विषयावर श्रीमती डॉ. मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.  दुपारी २ ते २.४५ या वेळेत ‘आधुनिक शेती’ या विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुके, मालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर ‘कोवळ्या पालेभाज्या’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत ‘संत साहित्य गाण्यामधून’ या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ, चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे.  कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.

या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर संजय बनसोड यांच्यासह ग्रंथोत्सव समन्वय समिती व संयोजन सहाय्य समिती यांनी केले आहे.