प्रयागराज, दि. १४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रयागराज येथे पत्नी अमृता आणि मुलगी दीविजा यांच्यासह कुंभस्नान केले.
कुंभस्नानानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, सहकुटुंब महाकुंभात येण्याचे भाग्य लाभले, याचा मला अतिशय आनंद आहे. यावर्षी १४४ वर्षांनी विशिष्ट योग आला आहे. त्या पर्वावर मला संगमावर स्नान करण्याचे भाग्य लाभले. कुंभमेळ्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे. एक नवा विक्रम आणि नवा इतिहास येथे घडला आहे. ५० कोटी भाविकांनी आतापर्यंत येथे उपस्थिती लावली आहे. भारताची आस्था पाहून संपूर्ण जग आज आश्चर्यचकित आहे. हीच आपली दिव्यता, हीच आपली भव्यता, हाच आपला कुंभ आहे. हेच आमचे संस्कार आहेत, हीच आमची संस्कृती आहे. २०२७ च्या नाशिक महाकुंभाची तयारी आम्ही सुरु केली आहे.
दरम्यान, प्रयागराज येथून मुख्यमंत्री फडणवीस थेट वाराणसीत गेले आणि तेथे त्यांनी सहकुटुंब काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले.
०००