ठाणे दि. १४: मौजे भाईंदरपाडा (गायमुख) येथील ठाणे महापालिकेच्या जागेवर विकसित होत असलेल्या एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीनद्वारे ओल्या कचऱ्यापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्प राज्यात पथदर्शी ठरेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ठाणे महापालिका हद्दीतील विकास कामांच्या पाहाणी दौऱ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मौजे भाईंदरपाडा येथे ठाणे महापालिकेची सुमारे 4190 चौ.मी. क्षेत्र घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. सध्या या जागेतील 1/3 जागेवर 90-100 टनांपर्यंत प्राप्त झालेल्या ओल्या कचऱ्यापासून पासून एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीनद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट खतांची निर्मिती प्रकल्प सुरू आहे. उर्वरित जागेवर हा प्रकल्प विस्तारित करण्यात येणार असून सुमारे 300 टनांपर्यंतचा घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.
Lahs Green India Pvt Ltd. SOLARISED CONTROL WINDROW COMPOSTING (IIT PAWAI, MUMBAI PATENTED) technology द्वारे अशा प्रकारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प राबविणारी ठाणे महापालिका देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे. या जोडीला Enviro Invent System Pvt. Ltd या कंपनीने बनविलेले Treatment Of The Waste On The Go (TOWGO vehicle) वाहनाद्वारे जागेवर एकावेळी सुमारे 2 टन ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यात येते, अशी लवकर अजून 20 वाहने उपलब्ध होत आहेत.
या पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे यथोचित स्मारक विकसित होत असलेल्या नांगला बंदराची देखील पहाणी केली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या प्रत्येक आगरी-कोळी कुटुंबांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करण्यात यावे!” असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महापालिका क्षेत्रातील विकास कामांला अडथळा ठरणाऱ्या अन्य जागेवरील अतिक्रमण निर्मूलन तातडीने करुन घ्यावे अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
०००